कामगारदिनी सफाई कामगार होणार सेवेत कायम
सरकारच्या निर्णयाचे स्वागत : बेळगाव महापालिकेच्या 689 जणांना मिळणार लाभ
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेत अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या 689 कंत्राटी कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेतले जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सफाई कामगारांतून समाधान व्यक्त केले जात आहे. महानगरपालिकांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेण्यात यावे, यासाठी कर्नाटक सफाई कामगार महासंघाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच कर्नाटक सफाई कामगार महासंघाचे अधिवेशन बेंगळूर येथे पार पडले. या अधिवेशनात बेळगाव येथील सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय यावेळी जाहीर केला.
मुख्यमंत्र्यांची घोषणा ठरली कंत्राटी कामगारांना दिलासादायक
बेळगावच्या सफाई कामगार हितरक्षण समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक दीपक वाघेला, विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, एस. एन. आदीयांद्रा, रामू साके आदी सदर अधिवेशनाला हजर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सफाई कामगारांच्या बाबतीत केलेली घोषणा कंत्राटी कामगारांना दिलासादायक ठरली आहे. सफाई कामगारांबरोबरच लोडर, क्लीनर, चालक, भुयारी गटार देखभालीचे काम करणारे कंत्राटी कामगार यांनाही ऑनलाईन वेतन दिले जाणार आहे.
सफाई कामगारांतून समाधान
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव महापालिकेतील सफाई कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. त्यांना आता 1 मे रोजीपासून सेवेत कायम करून घेतले जाणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. यापूर्वी बेळगाव महापलिकेतील 154 व त्यानंतर 94 सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेण्यात आले होते. आता पुन्हा 689 जणांना कायम करून घेतले जाणार असल्याने सफाई कामगारांतून समाधान व्यक्त केले जात आहे.