सफाई कर्मचाऱ्यांना ‘नमस्ते’ योजनेंतर्गत प्रशिक्षण
बेळगाव : महानगरपालिकेच्या ड्रेनेज आणि गटारी स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. पाच दिवसांचे प्रशिक्षण संपल्यानंतर संबंधितांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सध्या महानगरपालिकेत ड्रेनेज आणि गटारी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरीत्या प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. एखाद्या ठिकाणी ड्रेनेज किंवा गटार स्वच्छता करताना कोणत्या प्रकारची दक्षता घेतली पाहिजे, कशा प्रकारे काम केले पाहिजे, हातमोजे, मास्क व इतर साधने कशा पद्धतीने वापरावीत, याबाबत पाच दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत सदर प्रशिक्षण दिले जात आहे. पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची अर्धा तास परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण काळात घेतलेल्या माहितीची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. परीक्षेत 70 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना केंद्र सरकारकडून प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.