खानापूर नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नोकरीत कायम करण्याची मागणी : आश्वासनानंतर सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी नोकरीत कायम करावे, या मागणीसाठी नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. नगरपंचायतीचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी दोन दिवसांत खानापूरला भेट देऊन पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित केले आहे. खानापूर नगरपंचायतीच्या सफाई विभागात काही कर्मचारी अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सेवेत आहेत. अनेकवेळा नोकरीत कायम करण्याची मागणी करूनही त्यांना कंत्राटी कामगार म्हणून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी सफाई कामगार दिनादिवशीच आंदोलनाचे अस्त्र उगारले आणि सकाळी नऊ वाजताच नगरपंचायतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून धरणे आंदोलनास सुरुवात केली.
सफाई कामगार दिन साजरा करण्यासाठी सर्व नगरसेवक आणि अधिकारी जमले होते मात्र कर्मचारीच धरणे आंदोलनास बसल्याने कार्यक्रम करण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी कर्मचाऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आम्हाला नोकरीत कायम करून घेण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत असून अन्याय होत असल्याने आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर नगरसेवक लक्ष्मण मादर यांनीही कामगारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र कामगार आपल्या भूमिकेत ठाम होते. याबाबतची माहिती नगरपंचायतीचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना देण्यात आली. तेही कामानिमित्त बेंगळूरला गेल्याने त्यांनी असालीमठ सालीमठ यांना कामगारांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.
यावेळी सालीमठ यांनी आंदोलकांची भेट देऊन चर्चा केली आणि गुऊवारी प्रोजेक्ट डायरेक्टर आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याबाबत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहानूर गुडलार म्हणाले, प्रोजेक्ट डायरेक्टरांच्या चर्चेनंतर जर आमच्या मागण्याबाबत गांभीर्याने विचार केला नसल्यास सोमवारपासून पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी यल्लाप्पा हचणार, किरण केसरीकर, शिद्राय कांबळे,बाळू कुडाळे, बाळू चौगुले, यशोदा सावंत, शिवा कांबळे, राजू गुरव, अनुराज मैत्री यासह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होते. नगरसेवक लक्ष्मण मादर, नारायण ओगले, मेघा कुंदरगी आदी उपस्थित होते.