सफाई कामगार देवासमान : काडसिद्धेश्वर स्वामी
विहिंपतर्फे महाकुंभमेळ्यात पुण्यस्नान करून परतलेल्या भाविक-सफाई कामगारांचा सत्कार
बेळगाव : सफाई कामगार हे देवासमान असल्याचे बाराव्या शतकात जगद्ज्योती बसवेश्वर यांनी म्हटले होते. जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व असून स्वच्छतेचे काम करणारे कामगार हे सर्वत्र पूजनीय आहेत. जात, पात, पंथ यासारखा भेदभाव न करता हिंदू समाजाला एकत्र आणण्याचे व त्यांचा आदर करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्य निश्चितच प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन शिवापूरचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात पुण्यस्नान करून परतलेल्या भाविक व सफाई कामगारांचा सत्कार विहिंप बेळगाव शाखेच्या कार्यलयात समरस भवन येथे शनिवारी करण्यात आला. विहिंप व नगरसेवक यांच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम झाला. महाकुंभमेळ्यास जाणे शक्य न झालेल्या 200 हून अधिक सफाई कामगारांना प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील गंगाजलाचे वितरण करण्यात आले. विहिंपचे क्षेत्रीय प्रमुख कृष्णा भट म्हणाले की, देवाचे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात जातो. पण, आम्ही सकाळी उठण्यापूर्वी आपल्या भागाची साफसफाई करणाऱ्या कामगारांत आपण देव शोधला पाहिजे.
सफाई कामगारांचे कार्य सर्वश्रेष्ठ
चिन्मय मिशनच्या श्रद्धादीदी म्हणाल्या की, कुंभमेळ्यामध्ये कोट्यावधी भाविकांनी जात, भाषा, पंथ विसरून एकत्र येत त्रिवेणी संगमात स्नान केले. तेथून परतलेल्या भाविकांनी सफाई कामगारांना गंगाजल देऊन या कामगारांनाही पुण्य संपादन करण्याचे भाग्य मिळवून दिले. कुंभमेळ्यामध्ये स्वच्छतेचे काम केलेल्या तेथील सफाई कामगारांचे कार्य सर्वश्रेष्ठ आहे. या कामगारांचा सर्वांनी आदर केला पाहिजे. महानगरपालिका सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष मुनीस्वामी भंडारी यांनी विहिंपच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाला काळजीवाहू महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, गिरीश धोंगडी, श्रीकांत कदम, प्रमोदकुमार वक्कुंदमठ आदी उपस्थित होते.