For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सांगेत दांपत्याच्या मृत्यूने खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

11:09 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांगेत दांपत्याच्या मृत्यूने खळबळ  आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Advertisement
सांगे : सांगे तालुक्यातील बाडे-कुर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील धनगरवाडा येथे एका दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भारती जानू झोरे (वय 30) यांचा शनिवारी गळफास घेतल्याने मृत्यू झाला, तर त्यांचे पती जानू चिमणो झोरे (वय 39) यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे वाडे-कुर्डी आणि धनगरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पती-पत्नीमध्ये तोंडी बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर भारती यांनी घरातील दरवाजाला आतून कडी लावून घेतली. काही वेळाने त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर जानू यांनीही घराशेजारील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisement

गंभीर अवस्थेत असलेल्या जानू यांना ग्रामस्थांनी खाली उतरवून प्रथम सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणि पुढे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

या दांपत्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली असली, तरी त्याचा घटनेशी नेमका संबंध आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दांपत्याला अपत्य नव्हते, अशी माहितीही समोर आली आहे; मात्र त्याचा घटनेशी संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मडगावच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बोरकर यांनी पंचनामा केला. रविवारी शवविच्छेदन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यानंतर वाडे-धनगरवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.