संगोळ्ळी रायण्णा संग्रहालयाचे नंदगडला 19 रोजी उद्घाटन
कन्नड संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी, जि. पं. सभागृहात पूर्वतयारी बैठक
बेळगाव : खानापूर तालुक्यातील नंदगड येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांना समर्पित असलेले संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. संग्रहालयाची काही कामे बाकी असून, याची कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. या संग्रहालयाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सोमवार दि. 19 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याची जय्यत तयारी करावी, अशी सूचना कन्नड संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी दिली.
जि. पं. सभागृहात आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. तंगडगी पुढे म्हणाले, संगोळ्ळी रायण्णा सर्कल ते तलावापर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. तसेच तलावामध्ये संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारला आहे. मात्र, सध्या संग्रहालयाच्या कामामुळे तलावात काहीप्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे तलावाची स्वच्छता करून सभोवती पेव्हरब्लॉक बसविण्यात यावेत. जेणेकरून मुख्यमंत्र्यांना पुतळ्याचे उद्घाटन करता येईल. जिल्हा प्रशासनाने उद्घाटनाच्या अगोदर सदर कामे पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. उद्घाटनाआधीच सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
संग्रहालयासाठी 28 कोटींचा निधी मंजूर
संग्रहालयासाठी 28 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संग्रहालयाच्या निर्माणासाठी संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरणाची स्थापना करून त्यांच्यामार्फत कामे करण्यात येत आहेत. संग्रहालयातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. कामात काही चुका राहिल्यास सुधारणा करण्याच्या सूचनाही प्राधिकरणाला देण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनांही काही सल्ले दिले असून, त्यांच्या सल्ल्यानुसार कामे करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एच. एम. रेवण्णा, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, नावलगट्टी, अभिवन जैन, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.