नंदगडमध्ये उद्या संगोळ्ळी रायण्णा उत्सव
प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नंदगड ग्राम पंचायतीत बैठक : विविध कार्यक्रमांचे आयोजन
नंदगड : नंदगड ता. खानापूर येथे क्रांतिवीर संगोळळी रायण्णा यांचे समाधीस्थळ व फाशी स्थळ असल्याने येथे संगोळळी रायण्णा उत्सवाला सुरुवात करावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यानुसार शासनातर्फे गतवर्षीपासून संगोळळी रायण्णा उत्सव साजरा होत आहे. यावर्षी शुक्रवार 12 रोजी नंदगड येथे संगोळळी रायण्णा उत्सव साजरा होणार आहे. यावर्षीचा संगोळ्ळी रायण्णा उत्सव साजरा करण्याबाबत नियोजना संदर्भात नंदगड ग्रामपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी श्रवणकुमार नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. बैठकीला नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता मडिमनी, ग्रा. पं. सदस्य तसेच तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. चे कार्यकारी अधिकारी विरणगौडा एगनगौडर, महसूल अधिकारी टक्केकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर सोनोळी आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर शुक्रवारी सकाळी संगोळळी रायण्णा समाधीस्थळी पूजन, त्यानंतर ज्योतीचे प्रज्वलन होणार आहे. दुपारी 3 वाजता खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या कल्याण मंडपात नंदगड गावातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 5 वा. बाहेरून आलेल्या कला संघाकडून रायण्णा यांच्या जीवनपटावर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे होणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बैठकीद्वारे करण्यात आले आहे.