Sangli Crime : सांगलीच्या युवकाचा शहापूरमध्ये खून
इचलकरंजी महापालिका हद्दीत शहापूरमध्ये युवकाची निघृण हत्या उघडकीस
यड्राव - इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर येथील कृष्णा नगर परिसरातील महालक्ष्मी नगर येथे युवकाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निघृणपणे खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शाहीद शब्बीर शेख (रा. शामराव नगर, सांगली) असे मयत युवकाचे नाव असून खुनाचे नेमके कारण व हल्लेखोराचे नाव अद्याप निष्पन्न झाले नाही. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कृष्णा नगरकडून सोलगे मळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यातील मोकळ्या रानात एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्याचे समोर आले. हल्लेखोराने मृतदेहाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेले दगड व मयताचे चप्पल मिळून आले.
तपासासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचे पथक व श्वान पथकाला पाचारण केले.दगडावरील बोट बोटांचे ठसे घेण्यात आले तर श्वान पथकाने थोड्या अंतरापर्यंत माग काढला, परंतु श्वान तिथेच घुटमळले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली. अखेर मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. शाहीद शब्बीर शेख असे मयताचे नाव निष्पन्न झाले.