येळवी, खैराव परिसराला अवकाळी पावसाने झोडपले! झाड पडून म्हैस ठार तर पिके जमीनदोस्त
जत, प्रतिनिधी
मंगळवारी जत तालुक्याला वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. तालुक्यातील येळवी, खैराव परिसरात वादळी वाऱ्याने धुडघुस घातला. या भागातील ऊस व ज्वारीचे पिके आडवी पडली आहेत. खैराव येथील सारजाबाई दिलीप गोडसे यांच्या मालकीची म्हैस या वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावर पडून ठार झाल्याची घटना पावणे पाचच्या सुमारास घडली.
तालुक्यात मागील दोन दिवसापासून हवामान पूर्णतः बदलले आहे. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तालुक्यातील येळवी भागात पावसाने झोडपले होते. दुपारी चारच्या सुमारास जतसह तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील येळवी व खैराव भागात दुपारी चार ते सहा दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले.
या भागात म्हैसाळचे पाणी आल्याने रब्बीची पेरणी झाली होती. अगोदर ज्यांची पेरणी झाली होती त्यांची ज्वारी चांगली आली होती. ती ज्वारी पूर्णतः भुईसपाट झाली आहे. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या ऊस कारखान्याला जात आहे. या पावसामुळे उभा ऊस रानातच आडवा पडला आहे. कारखान्याला जाणाऱ्या ऊसाचेही वांदे झाले आहे. या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे खैरावमध्ये म्हैस जागीच ठार झाली. झाड अंगावर पडून सारजाबाई दिलीप गोडसे यांच्या मालकीच्या म्हैस जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.