For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्र्यांच्या बॉसच्या आदेशाने ठरणार सांगलीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन, कोयनेतून कमी विसर्ग सुरू

08:38 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्र्यांच्या बॉसच्या आदेशाने ठरणार सांगलीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन  कोयनेतून कमी विसर्ग सुरू
Advertisement

सांगली: सांगली शहराच्या सह जिल्ह्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कृष्णा नदीतून सांगलीपर्यंत पाणी पोहोचण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात एका मंत्री महोदयांना त्यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ बॉसचा आदेश हवा आहे त्यांच्या कानावर घातल्याशिवाय सांगलीच्या पाण्याचे भवितव्य ठरणार नाही असे संकेत मिळत आहेत.
सांगली पाटबंधारे मंडळाच्या मागणीनुसार कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून मंगळवारी रात्री आठ वाजता एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, हा विसर्ग मर्यादित क्षमतेने सुरू होत असल्याने सांगलीपर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सांगली शहराला पिण्याचे पाणी वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेज ते सांगलीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत शेतीसाठीचा खासगी उपसा आणि औद्योगिक वापरासाठीचा उपसा २५ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रकल्पांतील २०२६-२७ च्या रब्बी हंगामातील पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समिती आणि जिल्हा पाणी संनियंत्रण समितीची बैठक गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मात्र, पाणी नियोजनाच्या निर्णयांसाठी मंत्रालयातील वरिष्ठ स्तरावरील परवानगीची आवश्यकता असल्याने प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेला किती वेळ लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

कोयनेतून १,०५० क्युसेक्स विसर्ग

Advertisement

सांगली पाटबंधारे मंडळाच्या मागणीनुसार कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून १,०५० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचा इशारा कोयना सिंचन विभागाने दिला आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र, सध्या सुरू होणारा विसर्ग मर्यादित असल्याने कृष्णा नदीतील पाणीपातळी वाढण्यास आणि सांगलीपर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर या विलंबाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सांगलीत उपसाबंदीचा आदेश

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी २५ ऑक्टोबरपासून कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेजच्या खालच्या बाजूपासून सांगलीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठीचा खासगी उपसा आणि बिगर सिंचन, म्हणजेच औद्योगिक वापरासाठीचा उपसा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना मात्र सुरू राहणार आहेत.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील तरतुदींनुसार हा आदेश देण्यात आला आहे. अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. औद्योगिक वापरातील सांडपाणी थेट नदीत सोडून मर्यादित पाणीसाठा प्रदूषित करू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा एल-निनोच्या पार्श्वभूमीवर धरणे आणि जलस्रोतांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सांगलीतील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.

रब्बीच्या पाणी नियोजनासाठी गुरुवारी बैठक

सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने २९ ऑक्टोबर रोजी कराड येथे आयोजित केलेल्या बैठकीत धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी प्रकल्पांतील रब्बी हंगामाच्या पाणी नियोजनावर चर्चा होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देणे आणि उपलब्ध साठ्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, कोयना धरणातून सुरू होणारा मर्यादित विसर्ग, सांगलीतील उपसाबंदी आणि पाणी नियोजनाच्या निर्णयांची प्रतीक्षा या तिन्ही बाबींमुळे कृष्णेचे पाणी सांगलीत वेळेत पोहोचण्याचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे.

पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सांगलीपर्यंत आवश्यक पाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी आणि पुढील विसर्गाबाबतचे निर्णय यावर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अवलंबून राहणार आहे.

Advertisement
Tags :

.