For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान; सांगलीत चुरशीने मतदानानंतर; निकालाकडे लक्ष

10:46 AM May 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli   जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान  सांगलीत चुरशीने मतदानानंतर  निकालाकडे लक्ष
Sangli Voting
Advertisement

सांगली प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी दिनांक 7 मे रोजी अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चुरशीने 58 टक्के मतदान झाले होते. तर 120 मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे टक्केवारी सरासरी साठ टक्क्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह वीस उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनबंद झाले. परंतु 2019 पेक्षा मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. गतवेळी 65.71 टक्के मतदान झाले होते. येत्या चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement

मंगळवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी अनेक ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद कमी होता. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत 16.61 टक्के मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजेपर्यंत 29.65 टक्क्यापर्यंत आकडा पोहोचला. कडक उन्हाचा मतदानावर परिणाम होण्याची भिती मतदारांनी फोल ठरवत दिवसभर मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला. परंतु दुपारी तीन वाजल्यानंतर मतदान केंद्रावर मोठया रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यातील पद्माळे येथे सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांनी भाळवणी येथे मतदान केले.

Advertisement

तासगाव कवठेमहांकाळमध्ये सर्वाधिक चुरस
अठरा वर्षाच्या प्रथम मतदारापासून ते शंभरीपार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 58 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदान केंद्राच्या परिसरात आलेल्या मतदारांच्या उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. तासगाव तालुक्यात सर्वाधिक चुरशीने 61.16 टक्के मतदान झाले. तर मिरज तालुक्यात 59 टक्के, पलूस कडेगावमध्ये 56.45 टक्के, खानापूरमध्ये 51.11 टक्के, जतमध्ये 59.32 टक्के आणि सांगलीत 57.50 टक्के मतदान झाले.

किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान
किरकोळ अपवाद वगळता सांगली लोकसभा मतदार संघात शांततेत मतदान झाले. प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तर 50 टक्के मतदान केंद्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून वेबकास्टींग करत मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली होती. कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथे एका मतदाराने मतदानाचे व्हिडीओ शुटींग करून सोशलमिडीयावर व्हायरल केल्याने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही ठिकाणी बोगस मतदानाच्या आरोपावरून वादावादीच्या घटना घडल्या.

सहा हजार जवान करणार मतदान
सहा हजार सैनिकांना पोस्टल बॅलेटव्दारे मतदान करणार आहेत. या सर्वांना मतपत्रिका पाठवल्या आहेत. त्यापैकी चारशेपर्यंत जवानांच्या मतपत्रिका परत आल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत त्यांच्या मतपत्रिका स्वीकारल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

आटपाडीतील शेंडगेवाडीचा मतदानावर बहिष्कार
आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मतदानावर बा†हष्कार टाकला. यापूर्वी देखील अनेक निवडणुकांवेळी विकासापासून वंचित राहिल्याने बहिष्कार टाकण्याची भुमिका घेण्यात आली होती. पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये सामाविष्ट असलेली शेंडगेवाडी शहरापासून लांब आहे. आटपाडी नगरपंचायत अस्तित्वात येताना शेंडगेवाडी त्यातून वगळली आहे. तर आता शेंडगेवाडीला स्वतंत्र महसुली गाव जाहीर करण्यात आले. येथील लोकांची मागणी स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करावी, अशी आहे. तसेच डबई करून क्षेत्रातून गायरान द्यावे, असेही येथील लोकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मतदानावरील बहिष्कार कायम राहील अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Advertisement
Tags :

.