विट्यात रविवारी 'रन फॉर फार्मर' मॅरेथॉनचे आयोजन; दीड हजाराहून अधिक स्पर्धकांची नोंदणी
नोंदणीसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विट्यातील पहिलीच मॅरेथॉन स्पर्धा
विटा प्रतिनिधी
आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे 'रन फॉर फार्मर' या आयोजित केलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मॅरेथॉनसाठी तब्बल दीड हजाराहून अधिक स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये जवळपास 378 महिला व 1 हजार153 पुरुष स्पर्धकांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
याबाबत सुहास बाबर यांनी दिलेली माहिती अशी, रविवार 14 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता सौ शोभा काकी बाबर बीसीए महाविद्यालय गार्डी - विटा च्या प्रांगणात या विटा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे मोफत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट व मेडल मोफत देण्यात येणार आहेत. या ठिकाणी झुम्बा डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. चार ठिकाणी हायड्रेशन पॉईंट व रूट सपोर्टची सुविधा तसेच मेडिकल सुविधा आणि फिजिशियन ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती बाबर यांनी दिली.
टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आजवर शेतकऱ्यांचे साठी फार मोठे कार्य केले आहे. टेंभू योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित मॅरेथॉनला 'रन फॉर फार्मर' असे नाव देण्यात आले आहे. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सौ. शोभा काकी बाबर बीसीए महाविद्यालय गार्डी- विटा या ठिकाणी किट वाटप करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा पाच किलोमीटर व दहा किलोमीटर अशी होणार आहे. यामध्ये चार गटात एकूण वीस बक्षीस ठेवण्यात आली आहेत. स्पर्धा सौ. शोभा काकी बाबर महाविद्यालयापासून सुरुवात होईल. विटा शहरातील प्रमुख रस्त्यावरून स्पर्धेचा मार्ग असणार आहे, असेही बाबर यांनी सांगितले.
विट्यात प्रथमच मॅरेथॉन
विटा शहराला क्रीडा, साहित्य सामाजिक, सांस्कृतिक, अशी मोठी परंपरा आहे. अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील खेळाडू या भूमीत तयार झाले आहेत. परंतु विटा शहरात प्रथमच अशी स्पर्धा होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेतचार गटात एकूण वीस बक्षिसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रति आणि टेंभू योजनेचे जनक आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे - सुहास बाबर.