For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीचा 'दादा' विशालच ! भाजपचे संजय पाटील यांच्यावर एक लाखांवर मताधिक्याने मात; चंद्रहार पाटील यांचे डिपॉझीट जप्त

01:28 PM Jun 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
सांगलीचा  दादा  विशालच   भाजपचे संजय पाटील यांच्यावर एक लाखांवर मताधिक्याने मात  चंद्रहार पाटील यांचे डिपॉझीट जप्त
Advertisement

महाविकास आघाडीचे यांच्यासह १८ जणांचे डिपॉझीट जप्त

सांगली प्रतिनिधी

Advertisement

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील यांचे हॅटट्रीक करण्याचे स्वप्न धुळीला मिळवत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला. विशाल पाटील यांना पाच लाख 69 हजार 329 तर संजय पाटील यांना चार लाख 69 हजार 651 मते मिळाली.

तासगाव कवठेमहांकाळ आणि जत विधानसभा मतदार संघातील अल्प आघाडी वगळता संजय पाटील चारही विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिले. पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांनी 34 हजार 400 मतांची निर्णायक आघाडी मिळवली. तर मिरज 24700, सांगली 18000, तर खानापूर मतदारसंघात 17700 मतांची आघाडी मिळाली. तर तासगाव कवठेमहांकाळमध्ये संजयकाकांना 14 हजार आणि जतमध्ये 10 हजारांचे मताधिक्य मिळाले. महाविकास आघाडीचे पै. चंद्रहार पाटील यांना 60 हजार 92 मते मिळाल्याने त्यांच्यासह अठरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. नोटाला लक्षणीय 6509 मते मिळाली.

Advertisement

विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत वाढतच गेली. दुपारनंतर विशाल पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. विशाल पाटील यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी गर्दी होऊ लागली. परंतु विशाल पाटील आणि सौ. पूजा पाटील प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीकडे लक्ष ठेऊन होते. जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांना स्वत: विशाल पाटील मतमोजणीचे अपडेट देत होते. कदाचित निकालाचा अंदाज आल्याने भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्यासह कोणीही उमेदवार मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. विशाल पाटील यांच्या या विशाल विजयाने समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

मंगळवारी सांगली मिरज रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसच्या गोदामामध्ये मतमोजणी झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सात मे रोजी झालेल्या मतदानाचा टक्का 62.27 पर्यंत पोहोचला होता. 2019 च्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदान घटले होते. हा घटलेला मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने लोकसभा प्रचारात रंगत निर्माण झाली होती. प्रचार काळात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने निकालाबाबत प्रचंड उत्कंठा लागू राहिली होती.

विशाल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच भाजपचे संजय पाटील यांच्यावर आघाडी घेतली. विशाल पाटील यांचे प्रत्येक फेरीतील मताधिक्य पाहून विशाल पाटील समर्थकांचा व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढताना दिसत होता. सकाळी अकरा वाजल्यापासूनच विशाल पाटील समर्थकांची मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दी होऊ लागली. विशाल पाटील यांच्या वाढत्या मताधिक्याबरोबरच कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत होता. दुपारी एकच्या सुमारास आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे हेलीकॉप्टर कडेगावला उतरल्याची माहिती समजताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आले.

मिरज पॅटर्नपासून विशाल पाटील यांच्या आघाडीला सुरूवात झाल्याने सायंकाळी मिरजमधून त्यांच्या विजयी रॅलीला सुरूवात झाली. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत यांच्यासह प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची उघड्या जीपमधून भर पावसात सांगली ते मिरज गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली.

सर्व उमेदवारांना मिळालेली मते अशी
: विशाल पाटील 569651, संजय पाटील 4लाख 69 हजार 651, चंद्रहार पाटील 60155, प्रकाश शेंडगे 8150, अल्लाउदद्दीन काझी 9264, पांडूरंग भोसले 5513, टिपू सुलतान पटवेगार 5502, महेश खराडे 5491, रविचंद्र सोलनकर 3646, आनंदा नालगे 3531, शशिकांत देशमुख 2142, सतिश कदम 2851, सुवर्णा गायकवाड 1923, तोहिद मोमीन 1468, दत्तात्रय पाटील 1459, अजित खंडारे 1380, नानासो बंडगर 1291, जालिंदर ठोमके 1255, संग्राम मोरे 1003, आकाश व्हटकर 801, नोटा 6512.

सोशल मिडियातून अफवांचा महापूर
मतमोजणी संथगतीने सुरू होती. प्रत्येक फेरीचा निकाल सरासरी अर्धा ते पाऊण तासाने जाहीर करण्यात येत होता. परंतु सोशल मिडियातून अफवांचा महापूर सुरू होता. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच काही वाहिन्यांनी विशाल पाटील यांना आघाडी जाहीर करून टाकली. तर काहींनी पाचव्या फेरीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच बाराव्या फेरीची मोजणी आणि आघाडी जाहीर करण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे नागरिकांसह कार्यकर्त्यांचा गोंधळ उडत होता. दुपारनंतर मात्र सोशल मिडिया तोंडावर आपटत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अफवा कमी झाल्या.

जनतेने निवडणूक हातात घेतली ,दंडुकेशाही चालत नाही : विशाल पाटील
स्व. वसंतदादा घराण्याचाच नाही तर दादांचा विचार दाबण्याचे प्रयत्न झाले. त्यामध्ये काही प्रमाणात त्यांना यशही आले. परंतु सत्य फार काळ दाबून रहात नाही. सांगलीकर जनता दंडुकेशाही चालू देत नाही, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार विशाल पाटील यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विचाराचे आमदार जिल्ह्यात निवडून आणणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

मतमोजणीला विलंब
: सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरूवात झाली. परंतु नऊ वाजेपर्यंत पोष्टाच्या मतांची मोजणी सुरू होती. त्यामुळे प्रत्यक्ष इव्हीएम मशीनची मतमोजणी तब्बल एक तास उशिराने म्हणजे नऊ वाजल्यानंतर करण्यात आली. राज्यातील विविध जिल्हयांच्या मतमोजणीच्या फेऱ्यांचे निकाल बाहेर पडत असतानाच सांगली लोकसभेची मतमोजणी मात्र संथगतीने सुरू होती. त्यामुळे अनेक मतदार संघातील निकाल जाहीर होऊनही सांगलीची मतमोजणी सुरूच होती. अंतिम फेरीचा निकलही रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला नव्हता.

Advertisement
Tags :

.