Miraj news | सांगलीच्या अधीक्षकांचे 'ऑनफिल्ड पोलिसिंग'; आता दामिनी पथकाचा मिरजेत दरारा!
मिरजेत टवाळखोरांना 'जाग्यावरच चोप' मिळणार!
मिरज : सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर तुषार दोशी यांनी महिला सुरक्षा आणि नशेखोर, टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑनफिल्ड पोलिसिंग सुरू केले आहे.
त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याला पहिल्यांदाच भेट देऊन आढावा घेतला. मिरज शहरासह उपनगरीय भागात शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थीनी व महिलांच्या होणाऱ्या छेडछाडीवर प्रतिबंध आणण्यासाठी दामिनी पथक नियुक्त केले. छेडछाडीच्या घटना घडताच टवाळखोरांना जाग्यावरच खाक्या दाखवून चोप देण्याचा सर्वाधिकार या दामिनी पथकाला देण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यास भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला. काही विभागात त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी बदल करण्याच्या सुचना दिल्या. पोलिसांनीसमाजामध्ये आदरयुक्त भीती निर्माण करण्याबरोबरच सामान्य नागरिकांना न्याय आणि पिडीतांचे संरक्षण करण्याची भुमिका पार पाडावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. विशेष महिला सुरक्षेवर त्यांनी भर दिला आहे.
शाळा, कॉलेज, क्लासेस, उद्यान व सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी महिला दामिनी पथकाची नेमणूक केली. या पथकाला पेट्रोलिंग करण्यासाठी स्वतंत्र दुचाकी देण्यात आल्याआहेत.
हे पथक महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी गस्तीवर असेल. बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी हे पथक तैनात असेल. महाविद्यालय भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी गस्त घालणार आहे. शहर आणि उपनगरीय भागात प्रायोगिक तत्वावर हे पथक काम करणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे पाऊल उचलले आहे. छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.