सांगलीच्या जागेबाबत फेरविचार व्हावा- आमदार डॉ. विश्वजीत कदम
महाविकास आघाडीच्या निर्णयाने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या : सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करू
पलूस प्रतिनिधी
सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीच्या पत्रकार बैठकीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे जिल्हयातील कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने फेरविचार करावा. येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेवून यापुढील सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मत माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस येथे आयोजीत पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
पत्रकार बैठकीस आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, विशाल पाटील, जितेश कदम, जयश्रीताई पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सत्ताधारी भाजपा जातीयवादी पक्ष सत्तेत असल्यापासून महागाई वाढवली आहे. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी आघाडीने एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत काल महाविकास आघाडीने जागा जाहीर केल्या. यामध्ये सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या. सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आहे. सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी राज्यातील मुख्य नेत्यासमवेत बैठका झाल्या.
यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण याच्यासह दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्dयाक्ष मल्लिकर्जुन खारगे यांना आम्ही भेटलो. सांगली जिल्हयाची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी, काँग्रेस पक्ष ती जागा लढण्यास सक्षम आहे अशी भावना मांडली. सांगली लोकसभा मतदार संघात दोन आमदार आहेत. अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच आहेत. स्थानिक स्वराज्यसंस्था काँग्रेसच्या ताब्यात आहेत. असे असताना गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी अंतर्गत लोकसभा जागा वाटपात परिस्थिती झाली आहे ती सर्वाना ज्ञात आहे.
कोल्हापूराची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती. त्यामुळे ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली. या परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा दावा केला. उध्दव ठाकरे यांनी अचानकपणे चंद्रहार पाटील यांची उमेवारी जाहीर केली. त्यानंतरही काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी होत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना एकत्रित घेवून निर्णय घेणे आवश्यक होते अशी भूमिका घेतली. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबाबात सांगली जिल्हयातील लोकभावनेचा विचार घेवून निर्णय घेतला असता तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती.
काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातील 48 जागा जाहीर केल्या. सांगली जिल्हयाची राजकीय परिस्थिती व सत्य परिस्थिती काय आहे याचा पुन्हा एकदा माहिती घ्यावी. जर या निर्णयाबाबत फेरविचार करता आला तर तो करावा, अशी आजही सांगली जिल्हयातील कार्यकर्त्याची भावना आहे.