For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Satara Vidhan Parishad Election: कदम, पाटील यांच्यासह आठ जणांचे अर्ज

12:02 PM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli satara vidhan parishad election  कदम  पाटील यांच्यासह आठ जणांचे अर्ज
Advertisement
अभयसिंह जगताप यांचा अपक्ष म्हणून अर्ज : महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडूनही अर्ज दाखल
सांगली: सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी महायुतीच्यावतीने भाजपचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादीचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांच्यासह सात जणांनी अर्ज दाखल केले.
या निवडणुकीसाठी आठ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी (दि. २ जून) उमेदवारी अर्जाची छाननी होईल. काँग्रेसकडूनही दोन अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरू होती.
विधानपरिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती, त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता, मात्र अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांसह बडे नेते उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माध्यमधील नेते अभयसिंह जगताप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू होती.
सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार, नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह अपक्ष अशा सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले.यापूर्वी शिवसेनेच्या वतीने तानाजी पाटील यांचा अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे निवडणुकीसाठी एकूण आठ अर्ज दाखल झाले.
भाजपच्यावतीने सातारा जिल्ह्यातील धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचे अनेक नेते उपस्थित राहिले.
अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीकडून भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करताना बडे नेते उपस्थित राहिल्याने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.महाविकास आघाडीच्यावतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून प्रताप उर्फ बाळासाहेब धोंडीराम पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील व उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील यांनी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली.
दाखल झालेले अर्ज
धैर्यशील कदम भाजप, प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, तानाजी भगवान पाटील शिवसेना , संजय नायकू मेंढे काँग्रेस,  मयूर बाबासो पाटील काँग्रेस , सीमा सुनील पोतदारअपक्ष, अभयसिंह खाशेराव जगताप अपक्ष, किशोर हनुमंत धुमाळ अपक्ष
याशिवाय काँग्रेसचे महापालिकेतील नगरसेवक संजय नायकू मेंढे आणि नगरसेवक मयूर बाबासो पाटील यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जागा सोडण्यात आली आहे.
शरद पवार राष्ट्रवादीकडून प्रताप पाटील यांनी अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसकडूनही दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू होती.याशिवाय सीमा सुनील पोतदार, अभयसिंह खाशेराव जगताप, किशोर हणमंत धुमाळ यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक विभागाकडे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार (दि. २ जून) रोजी होणार आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.