विशाल पाटलांशी माझा उत्तम संवाद ! वेगळी भूमिका घेणार नाहीत : संजय राऊत
सांगली / प्रतिनिधी
विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहे त्यामुळे ते वेगळी भूमिका घेणार नाहीत असा आपल्याला विश्वास आहे. माझा त्यांचा उत्तम संवाद आहे अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांची बोलताना दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी राऊत सांगलीत आले होते. रात्री सांगलीतच मुक्काम करून त्यांनी अनेकांशी चर्चा केली. सकाळी मुंबईला परतण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, विशाल पाटील हे समजूतदार आहेत. ते वेगळी भूमिका घेणार नाहीत असा विश्वास आहे. विशाल हे महाविकास आघडीच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा ते वेगळी भूमिका घेणार नाहीत.
जागा काँग्रेसचीच दुमत नाही
राऊत म्हणाले, "सांगलीची जागा शिवसेना प्रथमच लढत आहे. परंपरेने ही जागा काँग्रेसची आहे याबाबत दुमत नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे इतर कोणी आमचे सहकारी नाराज असतील तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत.
अजितदादा, शिंदेंची पक्ष दिसणार नाहीत
वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी येत्या दोन महिन्यांत राज्यात एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असे म्हंटले. यावर प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर खरं बोलतात. त्यांना राजकीय भविष्य कळते. आम्हीही हेच सांगतोय की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष अजिबात दिसणार नाहीत.
मिलिंद देवरा कोण?
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी दलित असल्याने कॉग्रेसच्या वर्षा गायकवाडांना लोकसभेची उमेदवारी नाकारली असे विधान केले होते. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "कोण मिलिंद देवरा? मिलिंद देवरा यांचे आयुष्य काँग्रेस पक्षात गेलं मात्र राज्यसभेच्या एका खासदारकीसाठी त्यांनी दुसऱ्या पक्षात उडी मारली. मिलिंद देवरा ज्या पक्षात आहेत तो शिंदे यांचा पक्ष त्यांच्याकडून हे वदवून घेत आहे. आम्हाला दलित विरोधी म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही", असेही राऊत म्हणाले.