सुसंस्कृत राजकारणी बनणार सख्खे शेजारी! राजारामबापूंच्या पूर्णाकृती पुतळयाचे वसंतदादांच्या स्मारकाशेजारी अनावरण
शिवराज काटकर सांगली
ज्यांच्या राजकारणातील गटाची चर्चाच जास्त झाली आणि त्या गटबाजीच्या हवेवर नव्या सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाची मेढ रोवली गेली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या सुसंस्कृत आणि विधायक राजकारणाचा मिलाफ मंगळवारी सांगलीत होत आहे. दादांच्या स्टेशन चौक येथील स्माारकाशेजारी बापूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होत आहे.
राजारामबापू आणि वसंतदादा हे नाव निघाले की, किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी चर्चा होते ती दोघांमधील संघर्षाची. अर्थात चांदोली की खुजगाव येथे धरण उभे करायचे? याबाबतीतील तो विधायक वाद होता. ज्या वादात दोघांच्याकडूनही कधी एकमेकाचे नाव घेऊन किंवा न घेऊनही चिखलफेक तर झालीच नाही. पण, दुसऱ्याची बाजू चुकीची आहे असेही न म्हणता आपली बाजू कशी बरोबर आहे हे पटवणाऱ्या सभा दोन्ही बाजूंनी घेतल्या गेल्या... त्या काळातील ते सुसंस्कृत राजकारण आता मूर्तीरूपाने उभे राहणार आहे. आजचे सवंग, चिखलात बरबटलेले राजकारण आणि राजकारणी या दोन पुतळ्यांकडे पाहून त्यातून काही प्रेरणा घेणार का? हा प्रश्न आहे. ज्याचे उत्तर मंगळवारच्या कार्यक्रमातून मिळण्याची अपेक्षा जनतेला आहे.
दादा आणि बापूंचा तो काळ आठवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले, दादा स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे ते आधीपासूनच महाराष्ट्रात आदरणीय आणि राज्याचे नेते म्हणून प्रसिध्द होते. सहकारातील विधायकतेने त्यांना पराकोटीचे महान बनवले आणि राज्यभर त्यांच्या नावाचा गटही तयार झाला.
राजारामबापू त्यांच्या नंतर राजकारणात आले मात्र सुविद्य पिढी राजकारणात पुढे आणण्याच्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने बापूंचा राजकीय प्रवास सुरू झाला. लोकलबोर्डात म्हणजेच जिल्हा परिषदेत कारकीर्द गाजवून बापूंनी लक्ष वेधून घेतले आणि यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवले. तेथून त्यांनी भरारी घेतली. चव्हाण यांनी त्यांना आमदार आणि महसूल खात्याचे पूर्णमंत्री बनवले. त्यापूर्वी दादांच्या गटाचे जी. डी. पाटील हे दोनवेळा उपमंत्री होते. त्याकाळात त्यांच्याप्रमाणेच राजकारणात कार्यरत असणारे नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड किंवा एन. डी. पाटील हे परस्परांचा आदर करणारे मात्र विधायक विरोध करणारे नेते होते. कोणाच्याही विधायक कामाला विरोध करायचा नाही ही त्या सर्वांची भूमिका होती. त्यामुळेच गुलाबराव पाटील, आबासाहेब खेबुडकर अशा नेत्यांनाही वाव मिळाला. त्यांनी सहकार, उद्योग, कृषीक्षेत्रात भरीव योगदान दिले.
दादांचा सांगली जिल्हयातील सर्व तालुक्यात शब्द अंतिम असला तरी दादाही वाळवा तालुक्याचे निर्णय स्वतः न घेता राजारामबापूंकडेच उमेदवार निवडीपासून सर्व निर्णय सोपवायचे. परस्परांच्या संस्थांमध्येही हस्तक्षेप करायचा नाही असा अलिखित नियम पाळला जायचा. नेत्यांनी परस्परांच्या विधायक कामात आडकाठी आणली नाही म्हणूनच त्याकाळात संस्थांची उभारणी झाली आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. ७० ते ८० च्या दशकादरम्यान चांदोली खुजगाव वादावेळी तळातले कार्यकर्ते काही उलटसुलट भाषा वापरायचे पण, वसंतदादा कमीत कमी लोकांच्या जमीनी जाव्यात, ज्या लोकांनी स्वातंत्र्य सैनिकांना आसरा दिला त्यांना विस्थापित व्हावे लागू नये, लिफ्ट इरिगेशन गरजेचे आहे हे सांगायचे तर राजारामबापू, पाटाने पाणी दिले तर ते स्वस्त पडेल, ठिकाण बदलले तर जादा पाणी मिळेल ही भूमिका मांडायचे. अर्थशास्त्रीयदृष्टीने दोघेही मांडणी करायचे. जाहीर टीका टिप्पणी तर सोडा खासगीत पत्रकारांनी डिवचले तरीही विरोधात बोलत नसत. राजारामबापूंचा चेहरा हसतमुख होता. अशा एखाद्या कळीच्या प्रश्नावर ते केवळ स्मितहास्य करत आणि विषयाला बगल देत! दादांचे यशवंतराव चव्हाणांशी बिनसले आणि बापूंनी जनता पार्टीत प्रवेश केला तेव्हा वाद विकोपाला गेला. पण, तरीही दोन्ही नेत्यांच्या टीकेत कडवटपणा नव्हता... पुतळे उभे करायचे ते त्यांचा आदर्श घेण्यासाठी.... जनता आदर्श घेईलच. पण, महाराष्ट्रातील राजकारणी काय करणार?