...अजित पवार आले विजय बंगल्यावर; माजी मंत्री मदन पाटील गट दादांच्या गळाला लागल्याची जिल्ह्यात चर्चा
सांगली / प्रतिनिधी
अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाला आपल्या पक्षात घेण्यासाठी डाव टाकायला सुरुवात केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने विजय बंगल्यावर जाऊन त्यांनी सोमवारी रात्री उशिरा जयश्रीताई मदन पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी प्रमाणेच अजितदादा काँग्रेसला देखील धक्का देणार हे निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व नियोजित कार्यक्रम आटोपून दहा वाजण्याच्या सुमारास अजितदादा सांगली मिरज रस्त्यावरील विजय बंगल्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा, सहकार महर्षी विष्णूआण्णा आणि माजी मंत्री मदन पाटील या दिग्गजांचा बंगला म्हणून तो प्रदीर्घ काळ जिल्ह्याच्या राजकारणाचा साक्षीदार राहिला आहे. येथे दादा आल्याने राजकीय निरिक्षकानी भुवया उंचावल्या. कार्यकर्त्यांना दादा येणार याची खात्री असल्याने भाऊ गटाने रात्री दहा पासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. दादांनी जयश्री पाटील यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांच्या कन्या सोनिया होळकर, पुतणे इंद्रजित पाटील, जावई जितेश भैय्या कदम, नगर सेविका रोहिणी पाटील व जयश्री पाटील यांचे बंधू असे कुटुंबातील सदस्य तेवढेच उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र मदन पाटील गट अजित दादांच्या या भूमिकेनंतर सुखावला असून राजकीय शक्ती मिळेल अशी त्यांची भावना आहे. खुद्द पाटील परिवार आणि जयश्रीताई याबाबत काय निर्णय घेणार हे आता लवकरच स्पष्ट होईल.
मदन पाटील यांचा गट त्यांच्या निधनामुळे सैरभैर असून त्याला काँग्रेस मध्ये कदम कुटुंबाने आतापर्यंत ताकद देण्याचे काम केले. नाते संबंध असल्यामुळे भाऊ परिवार काँग्रेस बरोबर जोडून राहिला. मात्र महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांची गळचेपी होत राहिली. हेच हेरून अजितदादा सोमवारी रात्री विजय बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. यापूर्वी हाउसिंग फायनान्सची निवडणूक बिनविरोध करून दादांनी संदेश दिला होताच आता जिल्ह्यातील एक सुप्तावस्थेत असलेला आणि शरद पवार, जयंत पाटील यांच्या विरोधात बोलू शकेल असा मोठा गट त्यांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँगेस नेते झाले सावध
दरम्यान सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वी राज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील सावध झाले असून त्यांनी दिवसभर काँग्रेस कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांच्याशी आधीच चर्चा सुरू केली असून पक्ष न सोडण्याचे आवाहन केल्याचे समजते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.