भाजपचे पुन्हा संजयकाकाच उमेदवार; समर्थकांमध्ये उत्साह !
नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवून मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास
सांगली प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अखेर संजयकाका पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुऊ असलेल्या शहकाटशहाचे राजकारण, शंका-कुशंकाना ब्रेक लागला आहे. पक्षांतर्गत मोठा विरोध असूनही संजयकाकांनाच तिकीट मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान पक्ष नेतृत्वाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, असा ठाम विश्वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> मातोश्री’वरील शब्द मागे फिरणार नाही; सांगली लोकसभेचे मैदान मारणार- चंद्रहार पाटील
सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीचे त्रांगडे निर्माण झाले होते. पक्ष नेतृत्वानेही मोठी गोपनियता बाळगली होती. विद्यमान खासदार संजयकाका पाटील, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांची नावेही चर्चेत होती. तर काही दिवसांपूर्वी एका युवा नेत्याचेही नाव चर्चेत आले होते. त्यामुळे भाजपचे तिकीट कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पक्षांतर्गत विरोधाने खासदार संजयकाका पाटील यांना हैराण केले होते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबात शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप यावेळी धक्कातंत्राचा वापर करेल अशी चर्चा होती. मात्र सर्व चर्चांना छेद देत भाजपने अखेर खासदार संजयकाका पाटील यांच्या गळ्यामध्येच उमेदवारी घातली आहे. बुधवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. विजयाचा दावा केला.
नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवू
केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखविला आहे. सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसेवा करण्याची संधी दिली आहे. नेतृत्वाने दाखविलेला हा विश्वास सार्थ ठरवू. माझे सहकारी, जनता यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे हे फळ आहे. ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकून देतील. हॅटट्रीक होईल.
खा. संजयकाका पाटील, उमेदवार, भाजपा.