For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Breaking : अत्यंत धक्कादायक ! आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन

11:11 AM Jan 31, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli breaking   अत्यंत धक्कादायक   आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन
MLA Anil Babar
Advertisement

विटा प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाचे चार वेळचे आमदार अनिल कलेजेराव बाबर (वय ७४) यांचे निमोनियाच्या आजाराने बुधवारी निधन झाले. टेंभू योजनेचे जनक अशी ख्याती असलेल्या अनिल बाबर यांनी खानापूर आणि आटपाडी हे दोन तालुके सुजराम सुफलाम बनवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरातील प्रमुख साक्षीदार असलेले शिंदे गटाचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

Advertisement

निमोनियाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीच्या उषःकाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

खानापूर आटपाडी आणि तासगावचा काही भाग मिळून बनलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी चारवेळ्या प्रतिनिधित्व केले. ग्रामीण महाराष्ट्राची त्यांना उत्तम जाण होती. नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी प्रदीर्घकाळ भूषवले होते. याकाळात राज्यातील अनेक साखर कारखान्यांना त्यांनी तांत्रिक सहकार्य मिळवून दिले. सर्वसामान्य माणसांनी हाक द्यावी आणि आपली गाडी सोडून अनिल बाबर यांनी त्या हकेसरशी त्या व्यक्ती सोबत चालत त्यांना अपेक्षित असलेले सरकारी कार्यालय गाठावे आणि त्या व्यक्तीचे काम करून द्यावे असे नेहमीच घडत असे. आपल्या मतदार संघात कृष्णाचे पाणी वळवून ते पाणीदार नेते म्हणून प्रसिद्ध झाले. वयाच्या 19 व्या वर्षी गार्डी गावातून कार्याला सुरुवात करून सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत १९७१ सालच्या दुष्काळापासून त्यांनी तालुक्यात कामाचा ठसा उमटवला ते तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळाचा पिढ्यानपिढ्यांचा डाग कायमचा पुसण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या पश्चात पुत्र अमोल, सुहास यांच्यासह सूना नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement

अनिलराव बाबर यांचा जन्म कराड येथे झाला. त्यांचे शिक्षण महात्मा गांधी विद्यामंदिर विटा येथे झाले. १९७२मध्ये त्यांची गार्डीच्या सरपंचपदी निवड होऊन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्याचवेळी झालेल्या खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले. पुढे १९७९ मध्ये सांगली जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस पक्षातर्फे ते निवडून येऊन बांधकाम समिती सभापतिपदी त्यांची निवड झाली. १९८२ ते १९९० अखेर त्यांनी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना बाबर यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग इत्यादी जलसंधारणाची कामे तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी तळमळीने काम केले.
भाकुचीवाडी तलाव होत असताना भेंडवडे गावाचे पुनर्वसन करावे लागत होते. त्या कालावधीत अनिलराव बाबर यांनी सभापती असताना संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याकरिता शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भाकुचीवाडी प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू झाला व सर्व गावाच्या संमतीने भाकुचीवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लागले, तसेच ढवळेश्वर तलाव, येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

एक नोट एक व्होटचे पहिले आमदार
बाबर यांचा प्रचंड जनसंपर्क व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामामुळे १९९० मध्ये खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले. या निवडणुकीत जनतेने त्यांना एक नोट एक वोट देऊन विजयी केले होते. बहुदा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळेच जनतेच्या मतावर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची त्या काळात ख्याती होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. लोकांनी केलेले प्रेम आपल्या कायम स्मरणात राहील आणि त्यातून उतराई होण्यासाठीच या भागातील माणूस उभा राहिला पाहिजे यासाठी मी टेंभू योजना मांडली असे आमदार बाबर नेहमी म्हणत.

या काळात विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी टेंभू योजनेची मांडणी केली. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यामुळेच खानापूर आटपाडी सह टेंभूच्या कार्यक्षेत्रातील लोकांनी त्यांना टेंभू योजनेचे जनक अशी उपाधी दिली. तसेच त्यांनी मतदारसंघामध्ये रस्ते, वीज, जलसंधारण अशी अनेक कामे केली. पुढे १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली आणि
ते विधानसभेचे आमदार झाले. या काळात त्यांनी टेंभू योजनेच्या रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. २०१४च्या विधानसभेवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व ती निवडणूक जिंकली. २०१९मध्येही ले शिवसेनेतून पुन्हा उमेदवारी घेऊन खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत, पाणी, शेती, आरोग्य, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी त्यांनी प्राधान्याने काम केले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, पोल्ट्री, यंत्रमाग यांच्या प्रश्नांसंदर्भातही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, देशभरात काम करणाऱ्या खानापूर- आटपाडी परिसरातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यास ते नेहमी अग्रेसर असतात.

यशवंत सह. साखर कारखान्याचे संचालक म्हणून काही काळ व पुढे संपतराव माने यांच्या निधनानंतर ते चेअरमनपदी निवडून आले होते. सांगली जिल्हा मध्य, सहकारी बँकेवर संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले कार्य केले आहे. जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही ते काम केले आहे. पंचायत राज्य व्यवस्थेचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

आमदार अनिलराव कलजेराव बाबर संक्षिप्त परिचय

जन्म ७ जानेवारी १९५०

1972 ते 1978 सरपंच

1979 ते 1990 सभापती(ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग इत्यादी जलसंधारणाची कामे तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी तळमळीने काम केले.)

1990 ते 1995 पहिल्यांदा आमदार (या निवडणुकीत जनतेने त्यांना एक नोट एक वोट देऊन विजयी केले होते. बहुदा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा.)

1999 ते 2004 आमदार विधानसभा ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार. टेंभू योजनेला गती देण्याचा प्रयत्न)

1999 ते 2009 नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे चेअरमन

2014 ते 2024 आमदार (2014 ला शिवसेनेत प्रवेश)

पंचायत राज, लोकलेखा, रोजगार हमी योजना अशा विधिमंडळाच्या विविध समित्यांवर अभ्यासपूर्ण कामकाजाचा अनुभव

Advertisement
Tags :

.