मिरजेत दोन्ही शिवसेनेच्या शहर प्रमुखांमध्ये कार्यालयाच्या जागेवरून राडा; एकमेकांना अश्लील शिवीगाळ
प्रतिनिधी / मिरज
मिरजेत ऑफिसच्या बांधकामावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखामध्ये हाणामारी झाली. एकमेकास अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या ऑफिसचे काम बंद पाडलं आहे. अतिक्रमण काढण्यात आलेल्या महापालिकेच्या अधिकारी दिलीप घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांच्या संघर्षानंतर या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
हेही वाचा >>> मिरजेत ठाकरे गटाचे कार्यालय जमीनदोस्त! पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट
मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालय जवळ आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑफिससाठी बांधकाम सुरू केलं. मात्र सदर अतिक्रमण असल्याची तक्रार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आयुक्तांच्या कडे केली. अतिक्रमण काढण्यास आलेले महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्यात वादावादी झाली. मैंगुरे यांनी सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला ही जागा दिल्यामुळे उताऱ्यावर शिवसेनेचे नाव आहे त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका घेतली.
दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत या ठिकाणी आले. आमची शिवसेना खरी शिवसेना असून अतिक्रमण अधिकाऱ्याने काढावी अशी आक्रमक भूमिका रजपूत यांनी घेतली. यावेळी मैंगुरे आणि रजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोघांनीही अश्लील भाषेत एकमेकांना शिवीगाळ करत इशारे प्रतिसाद दिले. अधिकारी काम बंद करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रजपूत गट आणखीन आक्रमक झाला. मैंगुरे आणि रजपूत यांच्यात हाणामारी झाली. उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला.