Sangli Rain News: कायमस्वरूपी उपाययोजनांच्या दाव्यांचा फज्जा; व्यापारी, नागरिकांमध्ये संताप
03:33 PM Jun 08, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
कोट्यवधीचा खर्च पाण्यात
Advertisement
सांगली : मारुती चौकातील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढल्याचा दावा सहा महिन्यांपूर्वी केला होता. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही मोठमोठे डिजिटल फलक लावून हा प्रश्न कायमचा मिटल्याचा गवगवा केला होता. मात्र रविवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात हे सर्व दावे पोकळ ठरल्याचे दिसून आले.
मारुती चौक आणि मारुती रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अक्षरशः तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले. मात्र मुख्य व्यापारी पेठ असलेल्या मारुती रोडची अवस्था सर्वाधिक गंभीर झाली. रस्त्यावर साचलेले पाणी थेट दुकानांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. अनेक ठिकाणी ग्राहकांची वर्दळ ठप्प झाली असून व्यापारावरही परिणाम झाला आहे.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. पादचाऱ्यांनाही पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
मारुती चौकातील पाणी निचऱ्यासाठी केलेल्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा केला होता. मात्र पहिल्याच पावसात परिस्थिती पूर्वीप्रमाणे निर्माण झाल्याने या कामांच्या दर्जाबाबत आणि खर्चाच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, जर प्रश्न सुटला होता तर पहिल्याच पावसात चौक तळ्यात कसा बदलला? असा सवाल विचारला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होताना महापालिकेकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याची टीका होत आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था उभी करावी, अशी मागणी केली आहे.
Advertisement
.