मुंबईची भाषा सांगलीत चालतं नाही...विशाल पाटलांचा संजय राऊतांना टोला; उद्या भुमिका स्पष्ट करणार
सांगली / प्रतिनिधी
महाविकास आघाडीने पाडव्याला मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घ्यायचे ठरवले आहे. सांगली बाबत नेते तिथे काय भूमिका जाहीर करतात हे पाहून मग आपण आपली भूमिका जाहीर करू अशी घोषणा काँग्रेस उपाध्यक्ष आणि सांगलीत काँग्रेस कडून लोकसभेला इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
आपण काँग्रेस कडून लढण्यास इच्छूक आहोत आणि काँग्रेस आपल्याला उमेदवारी देईल असा आपल्याला विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. खा. संजय राऊत तीन दिवस सांगलीत राहिले आणि टीका करून गेले याचे आपल्याला दुःख झाले असेही ते म्हणाले.सांगलीत येऊन संजय राऊत विरोधात बोलले, त्याची खंत वाटतेः देशाला राऊतांची गरज आहे तरी ते 3 दिवस सांगलीत राहिले आमचे नेते विश्वजीत कदम यांच्या बद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच विरोधी बोलावे? हे योग्य नाही. एवढा मोठा नेता आमच्या सर्वांसाठी लढत आहे. संजय राऊत यांचे विश्वजीत कदम यांच्या विरोधात बोलणे योग्य नाही. आम्ही वैयक्तिक पातळीवर कधीही कोणावरही टीका केली नाही. विश्वजीत कदम दुसऱ्या पक्षात जाणार, असे संयज राऊत यांचे बोलणे योग्य नाही. संजय राऊत यांचे वक्तव्य हे महाविकास आघाडीमधील नेत्याला शोभणार नसल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. आता इथली परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्यामुळे आता त्यांचे मनपरिवर्तन झाले असेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे देखील विशाल पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई, दिल्ली प्रत्येक ठिकाणी आम्ही या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्णय घेतला होता. सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम होतो. इथे तिढा निर्माण होईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, तिढा निर्माण झाला आहे. त्या मागच्या कारणांचा जास्त विचार न करता त्याबद्दल आम्ही कधीही वक्तव्य केलेले नाही. आम्ही संयमाची भूमिका घेतली होती.
संजय राऊत भाजपा विरोधात बोलतात, तेव्हा आमच्याही मनामध्ये ऊर्जा निर्माण होते. आम्ही सर्व भाजप विरोधी विचारांचे आहोत. संजय राऊत यांच्या विषयी आमच्या मनात आदर आहे. एक चांगला आवाज पुरोगामी विचारांचा असल्याचे आम्हाला वाटते. मात्र संजय राऊत यांच्या आवाजाचा वापर सांगलीकरांच्या विरोधात केला गेला. यामुळे आम्हाला दुःख झाले असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. विश्वजीत कदम यांच्या बद्दल बोलणे, ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत, असे बोलणे हे योग्य नाही. हा महाविकास आघाडीतील युतीधर्म नाही.
महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होईल. त्यामुळे आता इतके दिवस थांबला आहात, तर पुढे काय होईल हे देखील उद्या समोर येईल, असे देखील विशाल पाटील यांनी म्हटले आहे. सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजपचे खासदार किती अपयशी ठरले आहेत, ते दाखवण्यात आम्हाला यश आले आहे. त्यामुळेच सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव शंभर टक्के निश्चित असल्याचा दावा विशाल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना उमेदवार देण्याची इच्छा होणे, यात गैर काहीही नाही. मात्र, सांगलीची जनता ही काँग्रेसच्या मागे उभी राहणार असल्याचा दावा देखील विशाल पाटील यांनी केला आहे.