Sangli : जिल्ह्यात सर्वत्र उत्साहामध्ये मतदानाला सुरवात; जाणून घ्या जिल्ह्यातील मतदान आणि त्याची टक्केवारी
संपुर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकला असला तरी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही लढत गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिली गेली आहे.
तिसऱ्या टप्यातील मतदानासाठी आज सकाळपासून मतदानकेंद्रावर गर्दी दिसून येत आहे. मतदानासाठी नागरीकांनी आज सकाळपासून मतदानकेंद्रावर रांगा लावलेल्या दिसून येत आहे. या मतदानासाठी नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्रथमच बजावला असून त्यांचा उत्साह प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून येत आहे. शहरी भागात आज सकाळी मॉर्निंग वॉक तसेच फिरायला गेलेल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच नोकरी आणि जॉब साठी बाहेर पडणाऱ्या तरूणाईने सकाळी लवकर मतदान करूनच घराच्या बाहेर पडण्यास पसंती दिली.
जिल्ह्यामध्ये आज सकाळी ९ वाजेपर्यत ६.६ टक्के मतदान झाले असून सकाळच्या प्रहरी लोकांची गर्द कमी होती. पण त्यानंतर १० च्या आसपास जिल्ह्यातील विविध मतदानकेंद्रावर गर्दी वाढून ती ११ वाजेपर्यंत १९.७६ टक्क्यांपर्यत वाढली.
मणेराजूरीमध्ये आकर्षक डिजीटल कमान
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरिता सांगली लोकसभा मतदारसंघातील द्राक्षपंढरी मणेराजुरी मधील मराठी मुलांची शाळानंबर दोनचे मतदान केंद्र मतदारांच्या स्वागतासाठी अनोख्या पद्धतीने सजविण्यात आलेले आहे ; परिसरातील विविध प्रकारच्या द्राक्षवाणांची चित्रे असलेली भव्यकमान उभा करण्यात आलेली आहे दिव्यांगासाठी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच तीन चाकी सायकल ठेवून खास सोय करण्यात आलेली आहे . या मतदान केंद्राची चर्चा तासगांव तालुक्यात होती .
104 वयाच्या महिलेने मिरजेत केले मतदान
मिरज मधील श्रीमती इंदिराबाई शिवराम भट रा. दत्त मंदिर ब्राह्मणपूरी मिरज
या १०४ वर्षे वयाच्या आजीनी आपला मतदानचा हक्क बजावला.
आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडीचा मतदानावर बहिष्कार: केंद्र पडले ओस
आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी येथे लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यापूर्वी देखील अनेक निवडणुकांवेळी विकासापासून वंचित राहिल्याने बहिष्कार टाकण्याची भूमिका घेण्यात आली होती. पूर्वी आटपाडी ग्रामपंचायत मध्ये सामाविष्ट असलेली शेंडगेवाडी शहरापासून लांब आहे. आटपाडी नगरपंचायत अस्तित्वात येताना शेंडगेवाडी त्यातून वगळण्यात आली आहे. तर आता शेंडगेवाडीला स्वतंत्र महसुली गाव जाहीर करण्यात आले. येथील लोकांची मागणी स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करावी अशी आहे. तसेच डबई करून क्षेत्रातून गायरान द्यावे असेही येथील लोकांचे म्हणणे आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मतदानवरील बहिष्कार कायम राहील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.