सांगली- कोल्हापूर बायपास मार्ग वाहतुकीसाठी बंद! उदगाव टोल नाका जवळ जयसिंगपूर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त
उदगाव / वार्ताहर
उदगाव परिसरामध्ये शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला, मात्र पुराचे पाणी रस्त्यावर आलेले सांगली- कोल्हापूर बायपास मार्ग पोलीस प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे प्रशासन उदगाव टोल नाका जवळ थांबून वाहनांना शिस्त व मार्गदर्शन करत आहेत. वाहतूक संत गतीने सुरू आहे.
गेले काही दिवस संतदार पावसामुळे तसेच धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे येथील ओढ्यामध्ये पुराचे पाणी वाढल्याने व रस्त्यावर आल्याने सांगली कोल्हापूर बायपास मार्ग गुरुवारी रात्रीपासून पोलीस प्रशासनाने बंद केला आहे सध्या वाहतूक ही जयसिंगपूर मार्गे संत गतीने सुरू आहे. त्याचबरोबर उदगाव ते जयसिंगपूर रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे. उदगाव टोल नाका जवळ जयसिंगपूर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त ठेवत बंदमार्गाबाबत माहिती तसेच वाहतूक शिस्त लावण्याचे काम करत आहेत.
शेती क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी थांबल्याने पिकाचे नुकसान होत आहे. गावामध्ये कुंजवन तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतराची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.
उदगाव ग्रामपंचायत च्या वतीने गावास पिण्याच्या पाणीपुरवठा करण्यात येतो तो प्रकल्प नदीकाठी असलेल्या जॅकवेल पाण्यात बुडाल्याने सध्या प्रकल्प तीन दिवस बंद आहे. सरपंच व ग्रामपंचायत प्रशासन जयसिंगपूर नगरपालिका किंवा संभाजी पूर ग्रामपंचायत कडून या बाबत काही मदत मिळते का यासाठी प्रयत्नशील आहेत. लवकरात लवकर गावात पाणीपुरवठा सुरू व्हावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे