जतेत भाजपच्या बैठकीत जोरदार राडा, भूमिपुत्रावरून उफाळला वाद! आ. पडळकर व रविपाटील समर्थक भिडले
जत, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून जोरदार राडा झाला. या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली आहे. हा वाद आ. गोपीचंद पडळकर व तमनगौडा रवी पाटील या दोन्ही गटात झाला. दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता येथील डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारी बद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता.
दरम्यान, याच बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जत मध्ये भूमिपुत्रालाच संधी द्यावी असा मुद्दा मांडला. याला आ. पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला. यावरूनच जोरदार वादावादीस सुरुवात झाली. या बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजगी आणि वादावादी होऊन एकमेकाचे अंगावर धावून जाण्याचा प्रकार येथे घडला. वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरली, प्रभारी रमेश देशपांडे, तमनगौडा रवी पाटील, प्रभाकर जाधव आप्पासाहेब नामद, दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
जत विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर येथे इच्छुक आहेत. तर जत मधून तमन्नागौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे, शंकर वगरे, डॉ. आरळी आदी इच्छुक आहेत. येथे पडळकर इच्छुक झाल्याने स्थानिक भूमिपुत्र आणि पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यापासूनच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जात आहे.
शिवाय इच्छुकां कडून जोरदार मोर्चे बांधणी देखील करण्यात येत आहे. उमेदवारीच्या याच प्रश्नावरून जत भाजपमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले आहे. त्याचा पहिला स्फोट शनिवारी प्रभारी रमेश देशपांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीतच झाला. शिवाय निवडणूक जवळ येईल तसे उमेदवारीच्या प्रश्नावरून वातावरण आणखीन चिघळत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते आता जत विधानसभेचा तिढा कसा सोडवणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
उपऱ्यांनी जत भाजपला गालबोट लावू नये : रवी पाटील
या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना जत विधानसभा प्रमुख रवी पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत सर्वांनाच आपापली मते मानण्याचा अधिकार दिला होता. येथील भाजपचे पदाधिकारी डी एस कोटी यांनी भूमिपुत्राचा मुद्दा मांडताच येथे बाहेरून इच्छुक असणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्रच का असा आक्षेप घेत स्टेजवर येऊन वादावादी आणि राडा करण्याचा प्रकार केला.
वास्तविक जत तालुक्यात ज्येष्ठ नेते विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र आरली यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अतिशय चांगले झाले आहे. पंचवीस तीस वर्षापासून येथे कार्यकर्ते राबत आहेत. आज पक्षाला चांगले दिवस आणले आहेत. लोकसभेला देखील पक्षाने ताकद दाखवली आहे, असे असताना बाहेरून येऊन येथे दादागिरी करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो यापुढे खपवून घेणार नाही. या घटनेचा इतिवृत्तांत वरिष्ठांना देखील करू असेही रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी डॉ. रवींद्र आरली, प्रभाकर जाधव, शँकर वगरे, बसवराज पाटील एकुंडीकर, सुनील पोतदार आदी उपस्थित होते.