सांगलीत सर्वपक्षीय ठरावाची होळी! शनिवारी सर्व पक्षांची अंत्ययात्रा काढणार
रविवारी रक्षाविसर्जन, सोमवारी पिंडदान, मंगळवारी उत्तरकार्याची घोषणा
सांगली/ प्रतिनिधी
बुधवारी सर्व पक्ष्यांनी एकत्र येऊन सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे बैठक घेऊन केलेल्या ठरावाचे सांगलीतील सर्वपक्षीय मराठा आंदोलकांनी होळी केली असून शनिवारी सर्व राजकीय पक्षांचा सामूहिक अंत्यविधी आणि पिंडदान आंदोलन घोषित केले आहे. शनिवारी सर्व राजकीय पक्षांचा तिरडी मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरले आहे.
याबाबत माहिती देताना मराठा आंदोलकांनी सांगितले की, गरजवंत मराठा समाजाला आरक्षण सर्वांनाच द्यायचे आहे. मात्र उघड भूमिका घेऊन एकही मराठा नेता अथवा कोणताही राजकीय पक्ष उघड भूमिका घेत नाही. आजवर सत्तेत येऊन गेलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या सतत बदलणाऱ्या आरक्षणा बाबतीतल्या भूमिकेला तिलांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांचा सामूहिक अंत्यविधी व पिंडदान आंदोलन सांगलीत होईल. शनिवार दि ४ रोजी राम मंदिर येथून सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल. ती राम मंदिर चौक काँग्रेस कमिटी, स्टेशन रोड, राजवाडा चौक महापालिका तेथून हरभट रोड ते अमरधाम अशी निघेल व सामूहिक दहन अमरधाम स्मशानभूमी येथे होईल. रविवार दि. ५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून सार्वजनिक नैवेद्य घेऊन रक्षा विसर्जन कार्यक्रम अमरधाम स्मशानभूमी येथे होईल. सोमवारी सामूहिक पिंडदान विष्णू घाट येथे सकाळी दहा वाजता होईल.
मंगळवार ७ रोजी उत्तरकार्य विधी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर होईल. हा कार्यविधी मराठा प्रबोधक ए. डी. पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे गाववाड्यातील सर्व मराठा बंधू-भगिनींनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून विधी पार पाडावे व सर्व राजकीय पक्षांच्या भूमिकेबद्दल असणारा आपला रोष व्यक्त करून त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी हा कार्यक्रम बैठक घेऊन ठरवण्यात आला. या बैठकीस सतीश साखळकर, डॉ संजय पाटील, पृथ्वीराज पवार शंभूराज काटकर, महेश खराडे, उमेश देशमुख विश्वजीत पाटील, अमोल झांबरे, रुपेश मोकाशी, राजू माने, गजानन साळुंखे, आनंद देसाई, संभाजीराव पोळ, ए डी पाटील, अमित लाळगे, राहुल पाटील, योगेश पाटील, जयवंत सावंत आदी उपस्थित होते.