Sangli : अखेर ताकारी योजनेचे आवर्तन सुरू! दुष्काळी भागाला मोठा दिलासा
देवराष्ट्रे वार्ताहर
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी ताकारी ऊपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झाले. त्यामुळे दुष्काळी कडेगाव, खानापुर, तासगाव आदी तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी मान्सुनने दडी मारल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे 23 जुले रोजी ताकारी योजना सुरू करण्यात आली. एक ते सव्वा महिना हे आवर्तन सुरू होते. या कालावधीत पाणी मिळाल्याने खरीप सह ऊस पिके तग धरु शकली. परंतु ऑक्टोबरपासुन विहीरीची पाणीपातळी खालावल्याने आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकर्यातुन होत होती. ताकारीच्या प्रशासनाने मागणीची दखल घेत आवर्तन सुरू करण्याची तयारी केली होती. परंतु नदीत पाणीसाठा कमी असल्याने योजनेचे आवर्तन लांबले गेले. पाटबंधारेकडुन कोयना प्रशासनाकडे ताकारी योजनेसाठी पाणी सोडण्याचे पत्र देण्यात आले. कोयनेतुन पाणी सोडण्यात आल्याने सोमवारी ताकारी योजना सुरू करण्यात आली. हे आवर्तन 10 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यावर्षी चार आवर्तनांचे नियोजन
ताकारी योजनेच्या माध्यमातून यावर्षी रब्बीसाठी दोन व उन्हाळी दोन अशा चार आवर्तनांचे नियोजन करण्यात आले आहे. साधारण एक आवर्तन पस्तीस ते चाळीस दिवसांचे असणार आहे. योजनेच्या एका आवर्तनास साधारणतः एक टीएमसी पाणी आवश्यक आहे. अशाप्रकारे चार आवर्तनांस चार टीएमसी पाणी आवश्यक आहे. कोयनेतुन पुरेसे पाणी ऊपलब्ध झाल्यास ही आवर्तने सुरळीत पार पडणार आहेत. योजनेसाठी 9.34 टिएमसी पाणी राखीव आहे.