'तंबाखू मुक्त शाळा उपक्रम' सांगली जिल्हा राज्यात दुसरा
सांगली :
'तंबाखू मुक्त शाळा' उपक्रमामध्ये सांगली जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. जिल्ह्यात २ हजार ८१७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि संबंधित यंत्रणेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.
जिल्ह्यामध्ये 'तंबाखू मुक्त शाळा' हा उपक्रम शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम फाऊंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नऊ निकषांची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या शंभर मीटर अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये असे फलक लावून प्रतिबंधित क्षेत्र आखण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, योजनेचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डॉ. विक्रमसिंह कदम, डॉ. विजयकुमार वाघ, ज्योती राजमाने उपस्थित होत्या.