दुष्काळाच्या नावाखाली दुष्काळ हरला, प्रस्थापित, नातेवाईक जिंकले : प्रकाशराव जमदाडे; जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकारणावर टीकास्त्र
06:03 PM Oct 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
जत, प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या असून, जत तालुक्यातील एक जागाही बिनविरोध झाली आहे. मात्र, सोसायटी ‘अ’ गटातील एका जागेसाठी निवडणूक लागल्याने दुष्काळाच्या नावाखाली निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे कारण पुढे करून प्रस्थापित नेत्यांनी आपल्या नातेवाइकांच्या जागा बिनविरोध करून घेतल्या; मात्र ज्या भागात खऱ्या अर्थाने दुष्काळाची तीव्रता आहे, तेथील कार्यकर्त्यांवर निवडणूक लादण्यात आली, असा संतप्त सवाल संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी उपस्थित केला आहे.
सांगली जिल्ह्याला सहकाराची समृद्ध आणि आदर्श परंपरा लाभली आहे. राज्यभरात सांगलीच्या सहकाराचे उदाहरण दिले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उभारणीत कै. राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील आणि सहकारमहर्षी स्व. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा विचार घेऊन या नेत्यांनी उभी केलेली परंपरा आजवर जपली गेली. मात्र, यंदाच्या निवडणुकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या परंपरेलाच छेद जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दुष्काळाचे कारण पुढे, पण निवडणूक मात्र कार्यकर्त्यांवर!
दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका योग्य मानली, तर मग सोसायटी ‘अ’ गटातील जागेसाठी निवडणूक का लावण्यात आली, असा थेट सवाल जमदाडे यांनी केला. जिल्ह्यातील काही प्रस्थापित नेत्यांनी आपल्या नातेवाइकांच्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांच्या जागा बिनविरोध करून घेतल्या. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत आहे. दुष्काळाच्या नावाखाली निवडणूक टाळायची असेल, तर तो नियम सर्वांना समान लागू व्हायला हवा. काहींसाठी बिनविरोध आणि काहींसाठी निवडणूक, अशी दुहेरी भूमिका का घेतली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पैसे आणि घराणेशाही जिंकली, प्रामाणिक कार्यकर्ते हरले!
जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नसून, सहकारातील मूल्ये आणि लोकशाही परंपरा जपण्याची संधी असते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेमागील राजकारणामुळे सर्वसामान्य सभासद शेतकरी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रस्थापित घराण्यांचे राजकीय वर्चस्व, नातेसंबंध आणि आर्थिक ताकद यांना प्राधान्य मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे सहकारात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळणार कशी, असा सवाल जमदाडे यांनी केला.
दरम्यान, जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वांना समान संधी देणारी असणे अपेक्षित आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींचे भान ठेवणे आवश्यकच आहे; मात्र त्याचा आधार घेऊन निवडणुकीतील राजकीय सोयीचे निर्णय घेतले जात असतील, तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.
सहकाराच्या आदर्श परंपरेला आत्मपरीक्षणाची गरज
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा इतिहास हा सहकार, शेतकरीहित आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा इतिहास आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत केवळ राजकीय समीकरणे किंवा उमेदवारांचे कौटुंबिक संबंध महत्त्वाचे न ठरता, सहकारातील योगदान, सभासदांचा विश्वास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची भूमिका यांना प्राधान्य मिळायला हवे.
दुष्काळाच्या नावाखाली निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली जात असेल, तर तिची अंमलबजावणी सर्व जागांवर समान पद्धतीने झाली पाहिजे. जतच्या बाबतीत एका मोठया सामाजिक समुदायाला या जागेपासून वंचित ठेवण्यात आले. हा अन्याय नाही का? असे सांगून याचे पडसाद एका जागेसाठी लागलेल्या निवडणुकी उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रकाशराव जमदाडे यांनी स्पष्ट केले.
Advertisement
Advertisement