सांगली जिल्हा बँक निवडणूक : संजयकाका पाटील विजयी; सुमनताई पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम राखले. मात्र, तासगाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांना अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. मिरजेतील शेतकरी भवन येथे झालेल्या मतमोजणीत विविध गटांचे निकाल स्पष्ट झाले.
तासगावमध्ये संजयकाका पाटील यांची सरशी
तासगाव सोसायटी मतदारसंघात संजयकाका पाटील आणि सुमनताई पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. या चुरशीच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी ३९ मते मिळवली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एक मताच्या फरकाने संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. या निकालामुळे तासगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजितराव घोरपडे यांचा १६ मतांनी विजय
कवठेमहांकाळ सोसायटी मतदारसंघात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली. त्यांनी रोहित पाटील गटाचे उमेदवार टी. व्ही. पाटील यांचा पराभव केला. घोरपडे यांना ३७ मते मिळाली, तर टी. व्ही. पाटील यांना २१ मते प्राप्त झाली. त्यामुळे १६ मतांच्या फरकाने घोरपडे विजयी झाले.
मिरजेत अण्णासाहेब कोरे यांना यश
मिरज सोसायटी मतदारसंघातून खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. त्यांना ४६ मते मिळाल्याने या गटात त्यांची सरशी झाली.
दरम्यान, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील निकालांमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. काही ठिकाणी अटीतटीच्या लढती, तर काही ठिकाणी स्पष्ट विजय पाहायला मिळाल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
