सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी 93.91 टक्के मतदान; जतच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष; मंगळवारी सकाळी मतमोजणी
जिल्हा बँकेच्या एकूण 21 संचालक जागांसाठी 351 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय नेत्यांमधील तडजोडीत 15 जागा बिनविरोध झाल्या, तर तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज सोसायटी गटांसह अनुसूचित जाती व भटक्या जाती-जमाती गटातील सहा जागांसाठी निवडणूक झाली. या सहा जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
जत, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये हायहोल्टेज लढती
तासगावमध्ये माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात लढत झाली. जत येथे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार, कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील, तर मिरजमध्ये अण्णासाहेब कोरे विरुद्ध अनिल शेगुणशे अशी प्रमुख लढत झाली. अनुसूचित जाती गटात के. डी. कांबळे विरुद्ध पी. टी. माने व विलास बेले, तर भटक्या जाती-जमाती गटात संभाजी कचरे विरुद्ध अमित पारेकर व माने अशी लढत झाली.
जत सोसायटी गटातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित भूमिका घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती. मतदानाच्या दिवशी जत केंद्रावर प्रचंड तणावाचे वातावरण होते. आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्यासह जत तालुक्याबाहेरील अनेक नेत्यांनी येथे उपस्थिती लावली. विरोधी उमेदवार विनोद पवार यांच्या समर्थनार्थ माजी आमदार विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अन्य नेते सक्रिय होते.
मतदान केंद्रनिहाय मतदान
जिल्ह्यातील 12 केंद्रांवर झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :
| मतदान केंद्र | एकूण मतदार | मतदान |
|---|---|---|
| आटपाडी | 163 | 161 |
| कवठेमहांकाळ | 156 | 141 |
| विटा | 129 | 120 |
| जत | 169 | 155 |
| तासगाव | 167 | 147 |
| मिरज | 211 | 195 |
| शिराळा | 229 | 219 |
| पलूस | 236 | 225 |
| कडेगाव | 162 | 161 |
| सांगली | 240 | 203 |
| एकूण | 2,446 | 2,297 |
जत केंद्रावरील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
जत मतदान केंद्रावर मतदानाची गोपनीयता भंग झाल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मतदान करून बाहेर आल्यानंतर मतदारांनी आपले मतदान दाखविल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत रीतसर निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र संपूर्ण निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडल्याचा दावा केला. माजी आमदारांनी शांततेत सुरू असलेल्या मतदानावेळी गोंधळ घालून रडीचा डाव खेळल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत कोण कोणते राजकारण केले, हे तीन तारखेनंतर सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांना विचारले असता, जत मतदान केंद्रावर मतदानाच्या गोपनीयतेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील तक्रारी आणि जत केंद्रावरील तणावाची चर्चा दिवसभर जिल्ह्यात रंगली.
मिरजेत 68 मतदार भरजरी फेट्यात
मिरज मतदान केंद्रावर खासदार विशाल पाटील यांनी सोसायटी गटातील मतदारांसाठी केलेले नियोजन चर्चेचा विषय ठरले. 12 वाहनांमधून 68 मतदारांना भरजरी फेटे बांधून आदर्श शिक्षण मंदिर मतदान केंद्रावर आणण्यात आले. खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी स्वतःच्या देखरेखीखाली मतदारांना केंद्रावर आणल्याचे पाहायला मिळाले.
कवठेमहांकाळमध्येही राजकीय शक्तिप्रदर्शन
कवठेमहांकाळमध्ये आमदार रोहित पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती होती. मिरज मतदान केंद्रावर खासदार विशाल पाटील स्वतः उपस्थित होते. सोसायटी गटातील मतदारांसह ते मतदान केंद्रावर दाखल झाले होते.
पडळकरांचा विरोधकांवर निशाणा
माजी आमदार विक्रम सावंत आणि माजी सभापती सुजय नाना शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून आदर्श आचारसंहितेला गालबोट लावल्याचा आरोप केला. मतदानाची गोपनीयता भंग झाल्याचा दावा करत निवडणूक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर टीका करत गुप्त मतदान असताना गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. दुष्काळाच्या नावाखाली निवडणूक बिनविरोध होत असताना जत, तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळमध्ये निवडणूक लादण्यात आल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक संपल्यानंतर आता जतच्या दुष्काळी उपाययोजनांवर गतीने काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीचे निकाल मंगळवारी स्पष्ट होणार असून, कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.