पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून! विट्यातील घटनेने जिल्हा हादरला
विटा प्रतिनिधी
भाड्याने राहण्यासाठी कोठे जायचे?, यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने घरातील खोरे डोकीत मारून पत्नीचा खून केल्याची घटना विट्यात उघडकीस आली आहे. सलमा गुराप्पा इकुरोट्टी ( 28 वर्षे, रा. खानापूर नाका, विटा, ता. खानापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी 3 जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस महेश अरूण संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (30 वर्षे रा. खानापूर नाका, विटा ता. खानापूर. मूळ रा. याडहळ्ळी ता. शोरपुरा जि. यादगीर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथिल खानापूर नाका येथे विजय उथळे यांचे मालकीचे खोलीत गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी आणि पत्नी सलमा गुराप्पा इकुरोट्टी भाड्याने रहात होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील एक कुटुंब काही महिन्यांपासून विट्यात वास्तव्यास होते. त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होता. बुधवारी 3 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून त्यांच्यात भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे? या कारणावरून वादावादी सुरू होती. याच दरम्यान रागाच्या भरात संशयित गुराप्पा इकुरोट्टी याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. यामध्ये सलमा जागीच ठार झाली.
विट्यात मजुरी करून गुजराण करणाऱ्या या कुटुंबातील खुनाच्या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संशयित गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी याला विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक पुजा महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत सलमाच्या मोबाईल मधील माहिती घेऊन सदर घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना कळवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.