खरसुंडीत तीन दुकाने फोडली : सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे चोरट्यांनी एका ज्वेलर्ससह तीन दुकाने फोडली. तिन्ही दुकानातून चोरट्यांनी तब्बल 3 लाख 17 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यात मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने, रोख रक्कमेचा समावेश आहे. खरसुंडी येथे बसस्थानक परिसरात असलेल्या सूरज अशोक गायकवाड (चिंचाळे) यांच्या मालकीचे सिद्धनाथ ज्वेलर्स, सिद्धेश्वर तरंगे यांचे सिद्धनाथ हार्डवेअर, प्रसाद जाहीर यांची पानपट्टी ही दुकाने चोरट्यानी शनिवारी मध्यरात्रीनंतर फोडली. सिद्धनाथ ज्वेलर्स मधून चोरट्यानी 2 लाख 92 हजार 500 रूपयांचे चांदीचे दा†गने लंपास केले.
यामध्ये चांदीचे वेगवेगळ्या डिजाईनचे एकूण 40 पैंजण, चांदीचे लहान-मोठे ब्रेसलेट, चांदीचे सरदारकडे, वेगवेगळ्या वजनाच्या चांदीच्या चेन, 30 वेगवेगळ्या वजनाचे चांदीच्या गणपती, सरस्वती, सिद्धनाथ घोडे, पाळणे, तुरा, लहान मुलांचे तोडे वाळे असे एकूण अंदाजे साडेचार किलोच्या चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांनी डला मारला.
सिद्धनाथ हार्डवेअरचे शटर उचकटून चोरट्यांनी वीस हजार रूपये आणि प्रसाद जालिंदर जावीर यांची पानपट्टी फोडून चोरट्याने ५ हजार रूपयांची रोकड व अन्य साहित्य चोरले. तिन्ही दुकानातून चोरट्यांनी एकूण 3 लाख 17 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे रविवारी लक्षात येतात खरसुंडी गावात खळबळ उडाली.