प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीचा गळा दाबून खून! जत येथील घटना : संशयित आरोपी ताब्यात
जत, प्रतिनिधी
जत येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. अक्षता सदाशिव कोरे (व.२१) असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशयित महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या आठवड्यातील हा दुसरा कोण आहे.
याप्रकरणी संशयित निखिल नामदेव कांबळे (व.१९) या तरुणास ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडे कसून चौकशी सुरू आहे.दोघेही एकाच वर्गात शिकत होते. घटनास्थळी निखिलचे ओळखपत्र सापडल्याने त्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटना समजताच तात्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली.यावेळी संबंधितांना पंचनामा करून आरोपींला तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या .तदनंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी करण्याच्या सूचना जत पोलिसांना दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अक्षता ही जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजे रामराव महाविद्यालयात कला शाखेत बी.ए च्या पहिल्या वर्गात शिकत होती. दरम्यान तिचे एका महाविद्यालयीन तरुणाची प्रेम प्रकरण जुळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणातूनच संशयित तरुणांने खून केल्याची घटना घडली आहे. अक्षता नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कॉलेज असल्याने घरातून बाहेर पडली होती. तिला तिच्या वडिलांनी सकाळी सात वाजता कॉलेजमध्ये सोडले होते.काही तास झाल्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली. यावेळी संबंधित व संशयित तरुण ही बाहेर पडला होता. दोघेही कॉलेज पासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या एका निर्मनुष्य व अडगळीच्या ठिकाणी गेले होते. सुरुवातीस गप्पा मारल्या होत्या.त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हे संशयित तरुणांनी कृत्य केले असावे असे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
संशयित तरुणाने अक्षताचा गळा दाबून नॅपकिनचा बोळा तोंडात घालण्यात आला आहे. यावेळी झालेल्या झटापटीत तरुणाचे कॉलेजचे ओळखपत्र घटनास्थळी पडले होते. यावरूनच खुनाचा छडा लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.आरोपींनी मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपीने अक्षताच्या डोक्यात दगड घातल्याचे दिसून आले. मृत्यू झाल्याची खात्री करून जागेवरून पलायन केले होते.
अकरा वाजल्यावर अक्षताला घरातल्यांनी अक्षताला कॉल केला. परंतु फोन लागत नव्हता . यावेळी तिचे वडीलानी कॉलेज मध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी ती कॉलेजमध्ये नव्हती त्यानंतर नातेवाईक व आसपासच्या परिसरात शोधा शोध केली. सायंकाळी चार वाजण्याच्या अक्षता हरवल्याची फिर्याद देण्यासाठी तिचे नातेवाईक ही पोलिसात पोहोचले, याच वेळी शेजारच्या काही अंतरावर असणाऱ्या लोकांना मृतदेह दिसल्याने उपविभागीय पोलीस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले होते.
नातेवाईकाचा आक्रोश
घटनास्थळावरून अक्षताचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला व नातेवाईकांचा आक्रोश व गर्दी हे मन हे लावून टाकणारे दृश्य झाले होते. या घटनेने जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओळखपत्रावरून संशयित आरोपीचा छडा.
संशयित आरोपीने प्रेम प्रकरणातून सकाळी झालेल्या वादातून तिचा काटा काढल्यानंतर घरी धूम ठोकली होती. परंतु यावेळी त्याच्या खिशातील आयकार्ड घटनास्थळी पडले होते. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याचा कसलाही लवलेश जाणवत नव्हता . शिवाय हे कृत्य केल्यानंतर घरी काही न केल्याच्या अविर्भावात बसला होता. परंतु पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.
जत मध्ये कायदा सुव्यवस्था आहे का?
शहरातील महाविद्यालयीन तरुणीचा हा खून झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये जत शहरात पोलिसांचा कसलाही धाक राहिला नाही. तरुण मुले गांजा डग्ज यासारख्या नशीली पदार्थांच्या आहार केले आहेत. अनेकांनी याबाबत पोलिसांना वारंवार सूचना दिल्या. परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई जत शहरात होत नाही. आता जनतेलाच पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल की काय अशी संतप्त प्रतिक्रिया डी पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे व माजी नगरसेवक मोहन भैय्या कुलकर्णी यांनी दिली. इथल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घुगे व थेट गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.