मैत्रिणीवरून तरूणांमध्ये हाणामारी! 14 जणांविरूध्द गुन्हा दाखल
सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद : रविवारी रात्री उशिरा माई घाटाजवळ झाला प्रकार : परस्परविरोधी फिर्याद
सांगली प्रतिनिधी
मैत्रिणीला त्रास का देतोस याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोन गटात जोरदार राडा झाला. या राड्यात दोन्हीकडील मिळून सहाजण जखमी झाले. तर यातील एकाची दुचाकीची मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा माई घाट येथे घडला. याचा तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अदित्य श्रीराम वैद्य रा. झुंझार चौक सांगली यांने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मित्र प्रथमेश सातपुते, हा त्याची मैत्रिण सिमरन हिला कोणीतरी त्रास देत असल्याचे समजल्यावर माई घाट येथे गेला. त्यावेळी काहीजण सिमरनला त्रास देत असल्याचे प्रथमेशला आढळून आल्यावर प्रथमेशने फिर्यादी अदित्य आणि इतर चार मित्रांना बोलावून घेतले. त्यावेळी सिमरन हिला त्रास आरबाज देत होता याबाबत जाब विचारला. यातून आरबाज आणि अनोळखी असणाऱ्या सहा ते सात जणांनी फिर्यादी अदित्य आणि त्याचे मित्र प्रथमेश, स्वयंम, हेमंत, सुमीत यांना शिवीगाळ करत मारहाण केली त्यातच प्रथमेशच्या दुचाकीचीही मोडतोड केली आणि आरबाज व अन्य पळून गेले. त्यानंतर जखमी फिर्यादी वैद्य यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आरबाज आणि अनोळखी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटाकडून जखमी फिर्यादी आरबाज मुजावर याने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मैत्रिण सिमरन हिच्याशी आपला ब्रेकअप झाला आहे याची माहिती असूनही सिमरनचा मित्र प्रथमेश आणि त्याचे काहीमित्र घटनास्थळी आले आणि त्यांनी आपल्याला जाब विचारला त्यावेळी झालेल्या भांडणात मला सोडविण्यासाठी आलेल्या माझे वडिल आणि मावस भाऊ यांनाही प्रथमेश व त्याच्या साथीदारांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर आरबाजने प्रथमेश, तसेच त्याच्या सहा ते सात मित्रांविरूध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.