आमदार विक्रम सावंत यांचा प्रदेश काँग्रेसला बंडाचा इशारा! विशाल पाटील हेच उमेदवार आणि पुढिल खासदार असा पवित्रा
सांगली प्रतिनिधी
कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीतून सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. आणि काँग्रेसकडून विशाल पाटील हेच आमचे उमेदवार आणि तेच पुढचे खासदार असतील. जर ही जागा काँग्रेसकडून सोडली किंवा तसेच उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न केला तर मात्र सन 2009 ला विधानसभेला जतमध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न सांगली लोकसभेत करण्याचा म्हणजेच बंड करून विरोधकांना साथ देण्याचा इशारा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिला.
काँग्रेसच्या नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी एक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनमध्ये झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सावंत म्हणाले, पदाधिकारी निवडीच्या बैठकीत लोकसभा ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. आम्ही नवीन सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस व एक सदस्याची निवड केली. पक्ष बांधणी मजबूत होत आहे. सांगली आम्ही पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने तयारी केली आहे. विशाल पाटील आमचे उमेदवार असतील, 2019 प्रमाणे जागा सोडू नये असे एकमुखी प्रदेश कार्यकारणीला कळवले आहे. सांगली हा काँग्रेसच्या हक्काचा मतदार संघ असून तो कदापी सोडणार नाही, असे आम्ही स्पष्ट सांगितले आहे. अर्थात, ती वेळच येणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळ गटतेने बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला आश्वस्त केले आहे.
काँग्रेसने जाहिर केलेले नूतन पदाधिकारी
वरिष्ठ उपाध्यक्ष - प्रा.सिकंदर जमादार (कसबे डिग्रज), उपाध्यक्ष आनंदराव रासकर (कडेगाव), संदीप जाधव (येलूर), संभाजी पाटील (बेडग), नंदकुमार शेळके (वाळवा), शिवाजी मोहिते (हरिपूर), खजिनदार - सुभाष खोत (कानडवाडी), सरचिटणीस - मिलिंद डाके, अण्णाराव पाटील (सनमडी), सदाशिव खाडे (कवलापूर), सदस्य - शेखर तवटे (एरंडोली).