Sangli News : साहेब, सांगा तुम्ही जाताय कसं?, आयुक्तांचे निवासस्थान चिखलात
वखारभाग येथे महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे
मिरज : पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण शहराची दैना उडालेली असताना खुद्द महापालिका आयुक्तांचे शहरातील निवासस्थानही चिखलात अडकले आहे. शहरातील वखारभाग येथे महापालिकेच्या विस्तीर्ण जागेत आयुक्तांचा बंगला त्यालगत मलः निस्सारण विभागाचे पंपिंग स्टेशन, शववाहिका विभाग, उद्यान आणि एक मंदिरही आहे.
मात्र, मुख्य रस्त्यापासून आयुक्तांच्या बंगल्याचा प्रवेशद्वार आणि परिसरही चिखलात अडकला असून सुटाबुटातले अधिकारी, साहेब या निवासस्थानी जातात कसे? असा सवाल सामान्य नागरिकांतून केला जाते. वखारभाग येथे महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. हे बहुतांशी नागरिकांना माहित नाही. त्यालगतच महापालिका मलः निस्सारण विभागाच्या पंपिंग स्टेशनमधील कर्मचारी दैनंदिन कामावर येत असतात.
याच परिसरात एक उद्यान आणि एक मंदिरही आहे. बंगल्यालगत असलेल्या मुख्य रस्त्यावर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ड्रेनेज पाईपलाईनचे काम सुरू आहे. अनेक कर्तव्य कठोर आयुक्त आले अन् बदली होऊन गेले. मात्र, एकाही आयुक्तांनी ड्रेनेज योजनेचे रखडलेले काम मार्गी लावले नाही. परिणामी ड्रेनेज पाईपलाईनसाठी बेसुमार रस्त्याची खुदाई करुन कामही अर्धवट सोडून दिल्याने वखारभागातील हा परिसर अक्षरशः नरक बनला आहे.
दुर्दैव शववाहिका म्हणजे वारंवार आंदोलने आणि मागणी करुनही रस्त्याची दुरुस्त झाली नसल्याने वा भागातील नागरिकांनी या रस्त्यावरुन येणे आणेही बंद केले आहे. प्रत्येक वेळच्या पावसाळ्यात या भागात दलदल होते. यावर्षीच्या पावसाळ्यातूनही हा परित्तर सुटला नाही. पावसामुळे शहराची दैना उडत असताना आयुक्तांचा बंगलाही आता दलदलीत फसला आहे. याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आयुक्त निवासाच्या गेटपासून दरवाजापर्यंतचा रस्ता चिखलाने बरबटलेला आहे.
या गेटच्या आत मनपाचे उद्यान, हनुमान मंदिर, पंपिंग स्टेशन आणि मनपाचे वाहनतळ असताना या परिसरात किमान पावसाळ्याच्या दिवसात तरी मुरुमीकरण करण्याचे तारतम्य महापालिकेने दाखविले नाही. या चिखलातून सरकारी अधिकारी-कर्मचारी व तक्रारदार नागरिक कसे आत-बाहेर करत असतील? लोकांनी इथल्या मंदिरात तरी कस यावच आणि लहान मुलांनी उद्यानात खेळायला तरी कसं यायचं? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मयताची वर्दी देणाऱ्यांसाठीच 'मरणवाट'
ढिम्म महापालिका प्रशासन आणि गलेलठ्ठ पगार घेऊन सुस्त झालेल्या अधिकाऱ्यांमुळे शहराची वाट लागली असली तरी नागरिकांना पर्याय नाही. चिखलामध्ये आयुक्तांचा बंगला फसला तरी गांभीर्य नाही. याच चिखलमय साम्राज्यात महापालिकेचा शववाहिका विभाग आहे. शहरात एखादे मृत झाल्यास शववाहिकेला वर्दी देण्यासाठी सामान्य नागरिकांना येथे यावे लागते.
पाच चिखलात शववाहिकाही अडकून पडत्या आहेत. वर्दी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना चिखल तुडवतच कार्यालयात जावे लागते. चिखलातून अनेक नागरिक घसरुन पडून अपघात घडत असल्याने शववाहिकेची वर्दी देणाऱ्यांसाठी महापालिकेने मरणवाट तयार करुन दिल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.