Sangli Breaking : मठाच्या आडुन अवैध दारू व गांजाची विक्री; रणरागिणींनी केला अड्डा उध्वस्त
महिला आक्रमक, आरोपीस अटक करण्यासाठी ठिय्या, मठाच्या आडुन करीत होता दारू गांजाची विक्री
सावळज / वार्ताहर
सांगली जिल्ह्यातील वडगाव (ता. तासगाव) येथे कथित रामकृष्ण हरी मठाच्या आडुन अवैध दारू व गांजा विक्री सुरू होती. वारंवार तक्रार करूनही अवैध धंदे सुरूच असल्याने येथील संतप्त महिलांनी आक्रमकपणे दारू व गांजा अड्डा उध्वस्त केला व आरोपीस तात्काळ अटक करण्यासाठी ठिय्या मांडला.
वडगाव येथे अंजनी रस्त्याजवळून काही अंतरावर शेतात द्राक्ष बागेच्या कडेला कथित रामकृष्ण हरी मठात झोपडीत हा अवैध दारू व गांजाची खुलेआम विक्री होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा सुरू होता. वारंवार तक्रार करूनही याकडे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या दारू व गांजामुळे अनेक तरुण व्यसनाधीन होऊ लागले होते. तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. दारु पिऊन महिलांना पुरुष मारहाण करीत असल्याने महिला वर्गातुन संताप व्यक्त करण्यात येत होता.
त्यामुळे संतप्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अवैध दारू अड्डा उध्वस्त केला. याठिकाणी अनेक दारुच्या मोकळ्या व भरलेल्या बाटल्या व गांजाच्या पुड्या आढळून आल्या. मात्र दरम्यान आरोपी फरार झाला होता. यावेळी महिलांनी संताप व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेत फरार झालेल्या आरोपीस पोलिस जोपर्यंत अटक करीत नाही तोपर्यंत त्याठिकाणी ठिय्या मारला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी ठिय्या आंदोलन माघार घेतले.
या रणरागिणींचे परीसरातुन कौतुक
दारुमुळे संसार उद्धवस्त होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी असावी यासाठी पुढाकार घेत आक्रमक पवित्रा घेत येथील अवैध दारू विक्री अड्डा उध्वस्त केला त्यामुळे या रणरागिनींचे परीसरातुन कौतुक होत आहे.