महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांवर गुन्हा! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अडचणी वाढण्याचे शक्यता
निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच खटाव आणि बेडगेत पदयात्रा
प्रतिनिधी मिरज
निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच तालुक्यातील खटाव आणि बेडग येथे पदयात्रा काढून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाची परवानगी न घेताच सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत दोन गावांमध्ये पदयात्रा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका चंद्रहार पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल झाल्याने चंद्रहार पाटील अडचणी देण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे रण आपले आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाकडून पैलवान चंद्रहार पाटील निवडणूक रिंगणात आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून मिरज मतदार संघातही दौरे बैठका घेत आहेत. बुधवारी त्यांनी तालुक्यातील बेडग आणि खटाव येथे काही कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातांमध्ये चंद्रहार पाटलांचे फलक घेऊन प्रचार केला. तसेच विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीही घेण्यात आल्या.
मात्र सदर पद यात्रेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह काही समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तर विरोधकांनी षडयंत्र रचून उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप होत आहे.