अजितदादांची मदनभाऊ गटावर नजर! जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसलाही धक्का देण्याची तयारी
आज सांगलीत राजकीय राईड
सांगली / प्रतिनिधी
खूप दिवस येणार, येणार म्हणून गाजत असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा सोमवारी सांगलीत आपली ' राजकीय राईड ' करणार आहेत. कबड्डी आणि खोखो स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन ते करणार असले तरी महापालिका निवडणुकीपर्यंत दिग्गज, त्यातही माजी मंत्री मदन पाटील गट आपल्या हाती लागेल का याची चाचपणी ते करणार आहेत. मदनभाऊ गटाने मात्र अद्याप सकारात्मकता दर्शविलेली नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हा म्हणून अजितदादांनी सातारा, कोल्हापूर बरोबरच सांगलीची जबाबदारीही आपल्याकडे घेतली आणि इद्रिस नायकवडी, वैभव पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे असे जयंतरावांचे कधीकाळचे खंदे समर्थक आपल्या बाजूला आणले. बघता बघता ही जंत्री वाढतच गेली. त्यात जयंतरावांच्या राजकारणामुळे सत्तेबाहेर गेलेल्या माजी मंत्री मदन पाटील गटाला ते खुणावत आहेत. त्यांच्या नगरसेवकांच्या मागे शक्ती उभी करण्याचे शब्द दिले जात आहेत. या गटाला चूचकारण्यासाठी त्यांनी मदन भाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या विरोधातील हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मधील उमेदवाराला माघार घ्यायला लावून बिनविरोध होऊ दिले. आता त्यांच्या वाढदिवसादिवशीच दौरा असल्याने दौऱ्यात समाविष्ट नसला तरी अचानक विजय बंगल्यावर भेटीचा कार्यक्रम होऊ शकतो अशी चर्चा आहे. सांगली, मिरज, कुपवाड, विटा, इस्लामपूर अशा सर्व महत्वाच्या शहरांना दादा कव्हर करत चालले असून आता तर इस्लामपुरात देखील बस्तान बसवण्याची तयारी सुरू झाली आहे.
दौरा कार्यक्रम असा
दुपारी ३.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व इस्लामपूरकडे प्रस्थान. ४.१५-इस्लामपूर राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटन, ५.१५ ते ५.३०- विटा (गार्डी) येथे स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे घरी सांत्वनपर भेट. ५.३० ते ६.१५- माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे निवासस्थानी चहापान. सायं. ७ सांगली येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी निवड चाचणी स्पर्धा भेट. ७.३० कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा उद्घाटन. रात्री पद्माकर जगदाळे यांचे निवासस्थानी भोजन . रात्री ९ वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रस्थान.
काँग्रेस नेते सावध
दरम्यान अजित दादांच्या दौऱ्याच्या निमित्ताने काँग्रेस नेते सावध झाले असून त्यांनी आजी, माजी नगरसेवकांशी संवाद सुरू केला आहे. सांगली विधानसभेला इच्छुक असणारे पृथ्वीराज पाटील आणि लोकसभेला इच्छुक विशाल पाटील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. तर सोमवारी सकाळी जयश्रीताई पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची विजय बंगल्यावर गर्दी होत आहे.