मामीसह एक वर्षाच्या भाच्याचा मृत्यू! दोन रिक्षांची समोरासमोर धडक
सांगली
बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे आश्विनी शीतल पाटील (वय 35, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ) आणि राघव रमेश पाटील (वय एक वर्षे) हे ठार झाले. मृत मामी आणि भाचा आहेत. बुधवारी 24 रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा. बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू आहे. त्यामुळे पै-पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. बुधवारी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार याच्या रिक्षा (एमएच 10 के 4952) मधून शेजारील ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील व चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते.
रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते. तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा (एमएच 10 सीक्यू 2768) येथे होती. परंतु या मालवाहतूक रिक्षाला हेडलाईट नव्हता. या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. यात प्रवासी रिक्षा उलटली. आतील पाच महिला व स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील ही मुले जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघेजण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सां†गतले. ऐन यात्रेच्या धामधुमीत झालेल्या या दुर्घटनेमुळे बुधगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.