For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संघाचा मोदींवर हल्ला सुरु

06:38 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
संघाचा मोदींवर हल्ला सुरु
Advertisement

लोकसभेत भाजपला बहुमत न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद मोदींना उपदेशाचे डोस सगळीकडून भरभरून मिळू लागले आहेत. गेली दहा वर्षे दबावाखाली असलेली प्रसारमाध्यमे देखील अचानक कंठ फुटल्यासारखी झाली आहेत. स्वतंत्र भारतातील एकमेव लोकोत्तर नेता अशी स्वत:ची छबी उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदींना एकदम सारे ‘अवघड आणि अशुद्ध’ झालेले आहे. त्यांच्या पत्रिकेत जणू सारे शनी-मंगळ एक झाले आहेत.

Advertisement

नवीन सरकारमध्येदेखील मोदींची प्रशासनावर पहिल्यासारखी पोलादी पकड राहील अथवा नाही हे लवकरच दिसणार आहे सध्यातरी त्यांचे टीकाकार वारा पिलेल्या वासराप्रमाणे उधळलेले आहेत. मोदी 3.0 प्रत्यक्षात कसे आहे ते कळायला थोडा वेळ लागणार आहे. अशातच पुढील आठवड्यापासून संसदेचे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. बरेच काही घडलेले असताना अगा काही घडलेच नाही असे पंतप्रधान दाखवत असतानाच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खड्या बोलाने त्यांना सावध केले आहे. खरेतर हा मोदींना पहिला झटका आहे. ‘जोर का झटका धीरेसे लगे’ याची खबरदारी मात्र संघाने घेतलेली आहे.

यशाचे कित्येक बाप असतात पण अपयश पोरके असते असे म्हणतात गेल्या दहा वर्षात प्रत्येक चांगल्या गोष्टीचे श्रेय पूर्णपणे घेणाऱ्या मोदींना तुम्ही बहुमत देऊ न शकल्याची जबाबदारी देखील घ्यावी असे सांगितले जात आहे. ज्या पद्धतीने जादा हुशारी दाखवून भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक न भरवून रालोआच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत स्वत:ची नेता म्हणून निवड करून घेऊन मोदींनी बऱ्याच जणांना चकित केले होते. मोदींच्या चालण्यातील रुबाब पहिल्यासारखा राहिलेला नाही असे जाणकारांना वाटत आहे. ज्याला ‘विश्वगुरू’ भक्तांनी मानले त्यांना नागपूरमधून मिळालेल्या बोधामृताने पक्षात खळबळ माजली नसती तरच नवल ठरले असते.

Advertisement

सेवकाला अहंकार नसावा लागतो, हे साधे असले तरी परखड बोल आहेत सरसंघचालकांनी मृदू भाषेत कान टोचले आहेत. त्याबरोबर राजकारणात सर्वांबरोबर काम केले गेले पाहिजे. विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत, हे सांगणे म्हणजे देखील सत्ताधाऱ्यांकडून बऱ्याच काही चुका झालेल्या आहेत हे दाखवणे होय. सत्तेत आल्यापासून मोदी यांनी संघाला गुंडाळून ठेवले आणि आपली मनमानी केली असे भाजपमधील एक गट मानतो. त्याला छेद देण्यासाठी नागपूर अचानक बोलके झालेले आहे असे मानायला जागा आहे.

संघ नेते इंद्रेश कुमार यांनी तर मोदी प्रणित भाजपला बहुमत मिळालले नाही याला कारण त्याचा अहंकार त्याला नडला, अशी स्पष्टोक्ती केलेली आहे. ‘ज्या राम भक्तांना गर्वाची बाधा झाली त्यांना प्रभुने 240 वर आणून ठेवलेले आहे’, असे सांगून त्यांनी भाजपनेतृत्वावर जिव्हारी वार केला आहे. संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमधील लेखात रतन शारदा यांनी अजित पवारांबरोबर घरोबा करण्याची अवदसा भाजपाला का बरे आठवली? असा सवाल विचारून भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्याबरोबर सत्ताधाऱ्यांना दोन शब्द सुनावण्याची संधी सरसंघचालकांनी ताबडतोब घेतली आणि त्याकरिता दसरा मेळाव्याची वाट पाहिली नाही यातून सरकार आणि भाजपचे वागणे संघाला असह्य झाले होते, असा काढला जात आहे. निवडणुकीच्या चार फेरी उरल्या असताना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘भाजप आता आपली आपण लढाई लढायला स्वयंपूर्ण झालेला आहे. त्याला संघाची गरज नाही. संघाने आपले हिंदुत्व विचार प्रसाराचे काम करावे’ असा शहाजोगपणे सल्ला दिला होता. अशा प्रकारचे विधान करून सर्व संबंधितांना त्यांनी स्तिमित करून टाकले होते. मोदींच्या कृपेने अध्यक्ष झालेले न•ा हे अशा प्रकारचे विधान स्वत:हून करण्याचे धारिष्ट्या करूच शकत नाहीत हे राजकीय वर्तुळातील सारे जाणतात. ‘गेली दहा वर्षे संघ का झोपला होता? त्याचा अण्णा हजारे का बरे झाला होता’, त्याने चीनची घुसखोरी असो, मणिपूरमधील वाढती हिंसा असो अथवा हाथरसमधील हत्या अथवा ऑलिम्पिक महिला पटूंची शोषणाची तक्रार असो तेव्हा मौन का बरे पाळले? हा विरोधकांचा सवाल गैरलागू नाही.

उत्तर प्रदेशातील भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा उध्वस्त झाल्याने संघाला

चिंता लागणे स्वाभाविक आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला त्या राज्यात भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील याची स्वप्नात देखील कल्पना सत्ताधाऱ्यांना आलेली नव्हती. उत्तरप्रदेशात घेतलेल्या सर्वेमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांनी मोदींपेक्षा जास्त गुण मिळवणे देखील त्यांना अनाकलनीय ठरले. हिंदुत्वाचे पोस्टरबॉय असलेल्या योगी आदित्यनाथ यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठी त्यांनी अनुमोदित केलेल्या उमेदवारांना

गृहमंत्री अमित शहा यांनी तिकीट नाकारले आणि त्यातून देखील पक्षाची हानी झाली असे आता पुढे येत आहे. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं?’ असा

योगी यांचा शहा यांना नेहमीच सवाल राहिलेला आहे. उत्तरप्रदेशात त्यांना फारशी ढवळाढवळ योगी यांनी करू दिलेली नाही.

मोदी यांचा ब्रँड कमकुवत झालेला आहे, त्याने पक्षांतर्गत लाथाळी वाढणार अशी भीती आहे. मोदी सरकारातील 19 मंत्र्यांचा निवडणुकीत झालेला पराभव बरंच काही सांगून जातो. या नव्या परिस्थितीत मोदींच्या हाती किती सत्ता ठेवायची याचे गणितदेखील संघाला मांडायचे आहे. संघाच्या आग्रहामुळेच 7-8 वर्षांपूर्वी योगींचे नेतृत्व उत्तर प्रदेशात पुढे आले होते. गेल्या दहा वर्षात मोदींचे प्रस्थ वाढले तसा संघाचा धाकदेखील कमी झाला होता. काही जणांच्या मते संघ पूर्णत: निष्प्रभ झाला होता.

भाजपला नवीन पक्षाध्यक्ष निवडताना संघ हस्तक्षेप करणार काय?

जे. पी. नड्डा यांच्या जागी कोण नवीन पक्षाध्यक्ष होणार यावर पक्षांतर्गत राजकारण कसे फिरणार यावर अवलंबून आहे. नवीन परिस्थितीत संघ याबाबत हस्तक्षेप करणार काय याबाबत उलटसुलट चर्चा ऐकू येत आहे. गेली दहा वर्षे शांत राहून मोदींना त्यांच्या कलाने सरकार आणि पक्ष चालवायची मुभा संघाने

दिलेही होती. आता नड्डा यांच्या जागी कोणाला आणावयाचे याबाबत नागपूरने जर काही वेगळा संकेत दिला तर मोदींना अवघड होऊन बसणार आहे. गेली दहा-बारावर्षे आपल्या मनासारखा आणि आपले मानणारा अध्यक्ष ठेवण्यात मोदी यशस्वी झाले होते. नितीन गडकरी यांना काढून राजनाथ यांना तिथे आणण्याचे कारस्थान याकरिता झाले होते की गडकरी हे कोणाच्या ऐकण्यातील नाहीत असा मोदींचा समज झाला होता. जर शिवराज सिंग चौहान यांच्यासारखा नेता पक्षाध्यक्ष झाला तर तो मोदींना ‘सळो की पळो’ करायला लावेल ही त्यांना भीती आहे

पुढील वर्ष हे संघाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या विचारसरणीचा विस्तार करण्याकरिता या संधीचा ते वापर करणार हे ठरलेले आहे अशावेळी मोदी सरकारला फारसे अडचणीत आणणे नागपूरला परवडणारे नाही. फट म्हणता ब्रह्महत्या व्हायची. कट्टर मोदी समर्थक असे मानतात की बदललेल्या परिस्थितीत केवळ पंतप्रधानांचाच सरकार आणि पक्षावर वरचष्मा आहे. मम् म्हणण्याशिवाय संघाच्या हाती काहीच नाही. पुढील काळात ‘किसमें कितना है दम’ हे दिसणार आहे. पंतप्रधानांची कसोटी सुरु झाली आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.