गांधींशी संबंधित संस्थांवर संघपरिवाराचा कब्जा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा दावा : पक्षाचे 84 वे अधिवेशन अहमदाबादमध्ये आयोजित
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये काँग्रेसचे 84 वे अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन बुधवारपर्यंत चालणार आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक चार तास चालली. या बैठकीनंतर कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना ‘पटेल अ लाइफ’ नावाचे पुस्तक देण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उलट आहे. स्वातंत्र्यलढ्यात कुठलेच योगदान नसलेली संघटना आता सरदार पटेल यांच्या वारशावर दावा करत असून हा प्रकार हास्यास्पद असल्याची टिप्पणी यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. भाजप अन् संघपरिवाराचे लोक गांधींशी संबंधित संस्थांवर कब्जा करत असून त्या गांधीच्या वैचारिक विरोधकांना सोपविल्या जात आहेत. वाराणसीत सर्व सेवा संघावर भाजपशी संबंधित लोकांनी कब्जा केला असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
गांधीवादी अणि सहकारी आंदोलनाच्या लोकांना वंचित ठेवले जात आहे. संघ विचारसरणीचे लोक गांधींचा चष्मा अन छडी चोरू शकतात, परंतु ते कधीच गांधींच्या तत्वांचे पालन करू शकत नाहीत असा दावा खर्गे यांनी केला आहे.
नेहरू-पटेल वाद निर्माण करण्याचा डाव
मागील अनेक वर्षांपासून अनेक राष्ट्रीय नायकांवरून एक सुनियोजित कट रचला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. तर काँग्रेसचा मागील 140 वर्षांपासून देशसेवा आणि लढाईचा गौरवशाली इतिहास राहिला आहे. भाजप-संघाकडे स्वातंत्र्यलढ्यात स्वत:च्या योगदानाच्या स्वरुपात दाखविण्यासाठी काहीच नाही. सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे परस्परांच्या विरोधात होते असे दाखविण्याचा भाजप-संघ परिवाराने केला. तर दोघेही एकाच नाण्याचे दोन पैलू होते हेच सत्य आहे. अनेक घटना आणि दस्तऐवज पटेल आणि नेहरूंच्या सौहार्दपूर्ण संबंधांचे साक्षीदार आहेत, असे उद्गार खर्गे यांनी काढले आहेत.
पटेलांकडून संघावर बंदी
पटेल यांची विचारसरणी संघाच्या विचारांच्या उलट होती. पटेलांनी संघावर बंदीही घातली होती. परंतु आता याच संघटनेचे लोक सरदार पटेलांच्या वारशावर दावा करत आहेत. महात्मा गांधी आणि सरदार पटेलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेचे सदस्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील स्वत:च्या अंतिम भाषणात काँग्रेस पक्षाच्या समर्थनाशिवाय संविधान निर्माण केले जाऊ शकत नव्हते असे उद्गार काढले होते. तर संविधान निर्माण झाल्यावर संघाने गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर आणि काँग्रेसवर टीका केली होती. रामलीला मैदानात संघाशी संबंधित लोकांनी या नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले होते अशी आठवण करून देत खर्गेंनी संविधान मनुवादी आदर्शांनी प्रेरित नसल्याचे वक्तव्य केले आहे.
मोदी सरकारकडून अपमान
मोदी सरकारने संसद परिसरातून गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे भव्य पुतळे हटवून ते एका कोपऱ्यात स्थापन करत त्यांचा अपमान केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. आंबेडकर यांचा अपमान केला होता. तर काँग्रेस पक्ष संविधान अणि संविधान निर्मात्यांचा सन्मान करतो. सरदार पटेल आमच्या हृदयात, आमच्या विचारात स्थान राखून असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
ओबीसी काँग्रेसपासून दुरावले
आम्ही दलित, मुस्लीम आणि ब्राह्मणांच्या मुद्द्यांमध्ये गुंतून राहिलो आणि ओबीसी आमच्यापासून दुरावले. आम्ही मुस्लिमांच्या प्रश्नांबद्दल बोलतो, याचमुळे आम्हाला मुस्लीमधार्जिणे म्हटले जाते. परंतु अशाप्रकारे कुणी बोलत असेल तर घाबरायचे नाही. नेत्यांनी सर्वसामान्यांचे मुद्दे उपस्थित करत रहावे असे राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे.