सांगेलीचा प्रसिद्ध गिरोबा उत्सव 1 मार्च रोजी
हजारो भाविकांच्या साक्षीने साकारणार गिरीजानाथाची मूर्ती ; ग्रामदेवतेची दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे एकमेव देवस्थान
ओटवणे प्रतिनिधी
सांगेली गावचे ग्रामदैवत गिरीजानाथाचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अर्थात गिरोबा उत्सव रविवार १ मार्च रोजी होत आहे. तब्बल २२ वर्षानंतर म्हणजेच दोन तपानंतर हा उत्सव गुरगुट सुतार टेंबवाडीत होत असल्याने या वाडीत उत्साहाचे वातावरण असुन या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त गेल्या १० दिवसांपासून दररोज विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामदेवतेची दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे सांगेली येथील गिरीजानाथ हे एकमेव देवस्थान आहे. गिरोबाची मूर्ती फणसाच्या झाडातून साकारली जाते. महाशिवरात्रीपासून या उत्सवाला प्रारंभ झाला असुन यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सुतारटेंबवाडी येथील अरुण शांताराम रेडीज यांच्या घराजवळच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली. या उत्सवासाठी उत्सव स्थळापासून सुतारटेंब वाडीतील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत असून आकर्षक कमानीसह भाविकांच्या स्वागताचे फलक झळकणार आहेत.आज बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता माडखोल म्हालटकर परिवार यांच्यातर्फे श्री देव भैरव जोगेश्वरी कुडाळ यांचा फुगडी कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी २६ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त (बुवाः संतोष धर्णे) यांचे भजन, रात्री ९ वाजता नरसिंह संगीत साधना, ओरोस (बुवाः अमित मेस्त्री) यांचे भजन होणार आहे. शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता गागी कलेक्शन-गागीं गावडे (पल्लवी रेडीज) आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता गोडाआंबा गुरगुटवाडी पुरस्कृत नितीन आसयेकर प्रस्तुत श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ (मळगाव) यांचा संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा भाग दोन पूर्वार्ध हा नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कु. शुभम नाईक गोवा, यांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता भव्यम हॉटेल महादेव दिपक नाईक पुरस्कृत श्री गणेश माउली संगीत ग्रुप यांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम होणार आहे.उत्सवात या फणसाच्या झाडाची दररोज विधिवत पूजा करण्यात येत असुन सायंकाळी ७: ३० वाजता आरती केली जाते. गेले १० दिवस याठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. याला भाविक तसेच रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी गिरोबा उत्सव रविवारी १ मार्च रोजी असून तोपर्यंत या उत्सवस्थळी दररोज होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरगुट सुतार टेंबवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे.रविवारी १ मार्च या उत्सवाचा मुख्य दिवस असून सायंकाळी ४ वाजता गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाणकाठीसह देवस्थानचे आठ पाच मानकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने सुतारटेंब येथे गिरोबा उत्सवस्थळी आल्यानंतर औक्षण त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात फणसाच्या झाडाला खाप लावण्यात येणार आहे. त्यानंतर गिरोबाची उत्सवमूर्ती हजारो भाविकांच्या साक्षीने घडविण्यात येणार आहे.