दोन शिक्षकांच्या समायोजनामुळे ८४ मुलांसाठी अवघे तीन शिक्षक !
शिक्षकांसाठी सांगेली ग्रामस्थांचा शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा
ओटवणे : प्रतिनिधी
सांगेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मधील दोन शिक्षकांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सांगेली येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ८४ पटसंख्या असलेल्या या शाळेत सध्या तीन शिक्षक असून येत्या दोन दिवसात या शाळेत तात्काळ दोन शिक्षक हजर न केल्यास थेट 'शाळा बंद आंदोलन' छेडण्याचा इशारा सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.शाळेत सद्यस्थितीत तीनच शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या संचमान्यतेनुसार या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक बाबली चिले आणि उपशिक्षिका साक्षी संजय शेडगे यांना 'अतिरिक्त' ठरवण्यात आले असून, त्यांचे नाव समायोजन यादीत टाकून त्यांची बदली दुसऱ्या शाळेत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ८४ पटसंख्या असलेल्या या शाळेत अवघ्या तीन शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावण्यासह आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी राहणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पटसंख्या ५९ तर इयत्ता ६ वी आणि ७ वीची पटसंख्या २५ इतकी मिळून एकूण ८४ पटसंख्या आहे. पुढील वर्षांतही ही पटसंख्या ९० पेक्षा अधिक राहणार आहे. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक संचमान्यतेचे कारण पुढे करून दोन शिक्षकांची बदली करण्याचा घाट घातला जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.याबाबत ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वी समायोजन यादीतून शाळेचे नाव कमी करण्याची विनंती केली होती. परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाच्या या संवेदनशून्य आणि आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी इथे दोन दिवसात दोन शिक्षक हजर न झाल्यास शाळा बंद करण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी विनायक सावंत, अमोल सांगेलकर, महेश चव्हाण, सुशील मेस्त्री, संदीप सांगेलकर, कृष्णा सांगेलकर नारायण सांगेलकर, कृष्णा सांगेलकर, सोनल राऊळ, सुनयना सांगेलकर, मंजिरी सांगेलकर, जानवी परब, सुमन नार्वेकर, पूजा राऊळ, श्रावणी राऊळ, शितल राऊळ, अमृता मेस्त्री, श्वेता राऊळ, सानवी सांगेलकर, दीपा मेस्त्री, अनुष्का सांगेलकर, पूजा राऊळ, आदिती राऊळ, प्रांजल राऊळ आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.