For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगेली-सावरवाड मधील दारू विक्री बंद न झाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण; भरारी महिला ग्राम संघाचा इशारा;जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव

सांगेली सावरवाड मधील दारू विक्री बंद न झाल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण  भरारी महिला ग्राम संघाचा इशारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव
Advertisement

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सांगेली-सावरवाड परिसरातील दारू विक्रीविरोधात भरारी महिला ग्राम संघ आक्रमक झाला असून, दारू विक्री व्यवसाय तातडीने बंद न केल्यास 2 ऑक्टोबरपासून जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यासंदर्भात संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहिकर यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन निवेदन साद केले.

Advertisement

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, कुटुंबातील सदस्यांच्या व्यसनामुळे मृत्यू, वाद-विवाद आणि कौटुंबिक कलहाच्या घटना वाढत असल्याचा आरोप महिलांनी केला. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप

दारू विक्रीबाबत यापूर्वी अनेकदा सावंतवाडी पोलीस ठाण्यात निवेदने आणि तक्रारी देण्यात आल्या. मात्र, त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. उलट तक्रारदारांवरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

दारू विक्री करणाऱ्यांकडून तक्रारदारांना शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार होत असल्याचा आरोप करत, दारू व्यवसायाला साथ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली.

कलंबिस्त पंचक्रोशीत पोलीस चौकीची मागणी

कलंबिस्त पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी, तसेच तेथे बीट अंमलदाराची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महिलांनी केली आहे.

दारू विक्रीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी करत ही कारवाई २ ऑक्टोबरपर्यंत न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

तक्रारदारांना संरक्षण देण्याची मागणी

दारूविरोधात आवाज उठविणाऱ्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित तरुणालाच पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून भरारी महिला ग्राम संघ कलंबिस्त-सावरवाड परिसरातील दारूच्या व्यसनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी काम करत असल्याचे महिलांनी सांगितले. पंचक्रोशीतील वैध-अवैध सर्व दारू व्यवसाय बंद करून परिसर दारूमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी अध्यक्षा सुप्रिया पंढरीनाथ मडगावकर, सरपंच देवयानी पवार, सविता ठाकूर, लक्ष्मी गावडे, धनश्री पवार, सुनीता लाड, मानसी पवार, सुवासिनी न्हावी, स्नेहा कुडतरकर आदी महिला उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.