For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवैध धंद्याविरोधात सांगेलीवासियांचा एल्गार !

10:53 AM Jun 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अवैध धंद्याविरोधात सांगेलीवासियांचा एल्गार
Advertisement

अवैध धंद्याना गावात बंदी ; ग्रामदेवतेच्या मंदिरातील गाव बैठकीत एकमताने ठराव

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

सांगेली गावात दारू, मटका व जुगार कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव शनिवारी सायंकाळी झालेल्या गाव बैठकीत एकमताने घेण्यात आला. गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक हिताचा विचार करून सर्व ग्रामस्थांनी गाव बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर केला. ग्रामदैवत गिरीजानाथ मंदिरात घेण्यात आलेल्या या गाव बैठकीत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी गिरीजानाथाला साकडे घालून प्रतिबंधासाठी मंदिरात शपथ घेण्यात आली.या गाव बैठकीत सर्वांच्या संमतीने सांगेली गावाच्या हद्दीत दारू, मटका व सर्व प्रकारचा जुगार कायमस्वरूपी बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावातील शांतता, सुव्यवस्था, युवकांचे भविष्य, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता तसेच गावाच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी पालन करून कोणीही दारू, मटका किंवा जुगाराचा अवैध व्यवसाय अथवा त्यास प्रोत्साहन देणारी कोणतीही कृती करू नये असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

अंमलबजावणीसाठी प्रशासनासह
लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणार !

या ठरावाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध संबंधित शासकीय यंत्रणेकडे तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव या गाव बैठकीत करण्यात आला. हा ठराव सर्व ग्रामस्थांनी श्री गिरिजानाथ देवाच्या साक्षीने एकमताने मंजूर केला असून तो गावाच्या हितासाठी कायमस्वरूपी लागू राहणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी बुधवारी २४ जुन रोजी गावातील ग्रामस्थांसह महिलांच्या सह्यांचे निवेदन खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात येणार आहे.या ठरावानुसार गावांमधील दारू विक्री बंद, दारू विक्रेत्याने गावात दारू विक्री करू नये. गावातील मटका, जुगार या व्यवसायांवर बंदी घालण्यात आली असुन गावामध्ये कोणी मटका घेऊ नये. तसेच गावातील चालणारा सर्व प्रकारातील जुगार गावाच्या हद्दीमध्ये खेळू नये. घरगुती वैयक्तिक कार्यक्रमांमध्येही घरमालकाने दारू वाटप करू नये. या गाव बैठकीला देवस्थानचे आठ पाच मानकरी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह सुमारे ४०० ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व ठरावांच्या अंमलबजावणीसाठी गावाच्या प्रत्येक वाडीतील प्रतिनिधींसह मंडळे नियोजन करणार आहेत.

Advertisement
Tags :

.