Crime News: दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचे अपहरण, गळा दाबून निघृण खून, एकास अटक
संशयितास न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथे दागिन्यांसाठी अपहरण करून बानू फकीर महमद जुवळे या 70 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी रिजवान जुवळे याला अटक केली. संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृत बानू फकीर महमद जुवळे या 2 मेपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची चुलत सून मुनीरा बशीर जुवळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ बेपत्ता नोंद घेऊन याप्रकरणी तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्वाचे धागेदोरे मिळाले.
सीवूड मुंबई येथून घेतले ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी हाजीरा मुसा माखजनकर, रिजवान महमूद जुवळे (दोघे रा. कडवई, उभीवाडी) आणि हुमायू शकील काझी (रा. फणसवणे) यांनी संगनमताने टाटा नॅनो गाडी (एमएच. 05 एएक्स 9098)मधून बानू जुवळे यांचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे, मुनीरा बशीर जुवळे यांच्या फिर्यादीनुसार संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुह्यातील संशयित आरोपी रिजवान महमूद जुवळे हा सीवुड्स-मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जुवळेची कसून चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली.
मृतदेह खिंडीतील जंगलमय भागात फेकला
रिजवान जुवळे, हुमायू शकील काझी आणि हाजीरा मुसा माखजनकर यांनी संगनमताने बानू फकीर मोहम्मद जुवळे यांचे अपहरण केले. त्यानंतर रिजवान जुवळे आणि हुमायू शकील काझी यांनी तिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नॅनो गाडीतून कडवई ते कुंभारखाणी बुद्रुक जाणाऱ्या रोडवरील खिंडीतील जंगलमय भागात खोल दरीत फेकून दिला.
संशयित आरोपी रिजवान जुवळेने घटनास्थळी मृतदेह दाखवला. तसेच, संशयित आरोपींनी महिलेच्या अंगावरून काढलेले 30 ग्रॅम 450 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी विकलेल्या सोनाराकडून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी), संगमेश्वर पोलीस ठाणे, प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे प्रभारी, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पो.हे.कॉ. सचिन कामेरकर, विनय मनवल, विश्वास बरगाले, दीपराज पाटील विवेक रसाळ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी), पो. कॉ. सोमनाथ आव्हाड आणि बाबुराव खोंदल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
संशयित आरोपी रिजवान जुवळे याला संगमेश्वर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून अजून माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. काही तांत्रिक बाजू पूर्ण झाल्यावर दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेऊ, असे संगमेश्वर पोलिसांनी सांगितले.